Ashish Nehra says Shubman Gill is the right person for captaincy : हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर शुबमन गिलला गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जीटीपूर्वी, तो चार वर्षे केकेआर संघाचा भाग होता. या काळात त्याची कामगिरी चमकदार होती, पण २०२२ मध्ये जेव्हा तो गुजरात संघात सामील झाला, तेव्हा तो येथे अधिक आक्रमक फलंदाजी करताना दिसला. पंड्याच्या नेतृत्वाखाली तो २०२२ च्या चॅम्पियन संघाचा सदस्य होता, तर २०२३ मध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या जीटी संघाचाही तो महत्त्वाचा सदस्य होता. आता त्याच्या नेतृत्त्वाबद्दल आशिष नेहराने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
पंड्याची जबाबदारी शुबमन चांगल्या पद्धतीने पेलू शकेल का?
उजव्या हाताचा गिल गेल्या मोसमात जीटीसाठी एकूण १७ सामन्यांमध्ये खेळताना दिसला. दरम्यान, त्याच्या बॅटमधून ५९.३३ च्या सरासरीने ८९० धावा आल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १५७.८० होता. या स्पर्धेदरम्यान त्याने आपल्या बॅटने तीन उत्कृष्ट शतके झळकावली. गिलची फलंदाजी तर सर्वांनाच माहीत आहे, पण पंड्याची जबाबदारी तो चांगल्या पद्धतीने पेलू शकेल का, हा प्रश्न आहे. गेल्या दोन मोसमात संघाने सलग अंतिम फेरी गाठली आहे. अशा स्थितीत यावेळी तो संघाला अंतिम फेरीत नेण्यात यशस्वी होईल का, हा मोठा प्रश्न आहे.
आयपीएल हा वेगवान खेळ – आशिष नेहरा
प्रश्न आणि अटकळांच्या दरम्यान गुजरात संघाचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराने मोठे विधान केले आहे. संघ प्रत्येक क्षणी त्याच्या निर्णयाला पाठिंबा देईल, असे तो म्हणाला. एवढेच नाही तर त्याने युवा गिलला संघाच्या कर्णधारपदासाठी सर्वोत्कृष्ट व्यक्ती असेही म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी एका खास संवादादरम्यान नेहराने सांगितले की, ‘आयपीएल हा वेगवान खेळ आहे आणि तो प्रत्येकासाठी आव्हाने देतो. गेल्या तीन-चार वर्षांत गिलची कामगिरी कशी आहे, हे आपण पाहत आहोत. सध्या तो २४-२५ वर्षांचा आहे, पण त्याला चांगला अनुभव आहे.’
हेही वाचा – IPL Auction 2024 : पान टपरी चालविणाऱ्याचा मुलगा ठरला कोट्यधीश; जाणून घ्या कोण आहे शुभम दुबे?
मी अशा लोकांपैकी नाही जे नेहमी निकालाकडे पाहतात –
पुढे बोलताना आशिष नेहराने सांगितले की, संघातील आम्ही प्रत्येक क्षणी त्याला साथ देण्यासाठी उपस्थित आहे. संघाचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला कर्णधार नियुक्त केले आहे. मी अशा लोकांपैकी नाही जे नेहमी निकालाकडे पाहतात. सामन्यादरम्यान प्रत्येकजण निकालासाठी प्रयत्नशील असतो. सामन्यादरम्यान सर्वांची नजर निकालाकडे असते. तथापि, जेव्हा कर्णधारपदाचा विचार येतो, तेव्हा तुम्हाला प्रत्येक पैलूकडे लक्ष द्यावे लागते. आम्हाला विश्वास आहे की तो संघासाठी योग्य व्यक्ती आहे.’
गुजरात टायटन्सचा संघ: शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक)केन विल्यमसन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, साई सुधरन, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शाहरुख खान, रॉबिन मिन्झ (यष्टीरक्षक) राहुल तेवतिया, जयंत यादव, विजय शंकर, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे, उमेश यादव, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, जोश लिटल, स्पेन्सर जॉन्सन,राशिद खान, नूर अहमद, आर साई किशोर, मानव सुथार.
लिलावात विकत घेतले खेळाडू: अजमतुल्ला उमरझाई (५० लाख रुपये), उमेश यादव (५.८० कोटी), शाहरुख खान (७.४कोटी), सुशांत मिश्रा (२.२ कोटी), कार्तिक त्यागी (६० लाख), मानव सुथार (२० लाख लाख), स्पेन्सर जॉन्सन (१० कोटी), रॉबिन मिन्झ (३.६ कोटी).