बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीसाठी भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी, बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली, आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव जय शाह आदी प्रमुख मंडली उपस्थित होती. यावेळी बीसीसीआयशी संबंधित इतर महत्त्वाच्या विषयांसोबतच नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांवरही शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानुसार, रॉजर बिन्नी हे आता बीसीसीआयचे नवे अध्यक्ष असणार आहेत. मात्र, त्यासोबतच आशिष शेलार यांच्याकडे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणाऱ्या बीसीसीआयच्या तिजोरीच्या चाव्या आल्या आहेत. आशिष शेलार यांची बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
आठवड्याभरापूर्वीच, अर्थात ११ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली होती. या बैठकीतच रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यावर शिक्कारमोर्तब झाल्याचं सांगितलं जात होतं. त्यासोतच राजीव शुक्ला यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, यामध्ये आशिष शेलार यांचं नाव कोषाध्यक्षपदासाठी चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
मुंबई क्रिकेट संघटनेसाठी अर्ज
आशिष शेलार यांनी नुकताच मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. शरद पवारांनी आशिष शेलारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यानंतर त्यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता आशिष शेलार यांची बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.