नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांची त्रसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीवर निवड झाली आहे. भारताच्या माजी क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक या आधीपासून सल्लागार समितीचा भाग आहेत. मल्होत्रा, परांजपे आणि नाईक यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) नवी राष्ट्रीय निवड समिती नेमण्याची जबाबदारी असेल.
ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला आलेल्या अपयशानंतर ‘बीसीसीआय’ने निवड समितीची उचलबांगडी केली होती. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीवर हरिवदर सिंग, सुनील जोशी आणि देबाशीष मोहंती यांचा समावेश होता.
मल्होत्रा आणि परांजपे यांची अनुक्रमे मदन लाल आणि रुद्र प्रताप सिंह यांच्या जागी सल्लागार समितीवर निवड झाली आहे. केवळ माजी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असणाऱ्या नाईक या सल्लागार समितीवर कायम आहेत.