ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना अ‍ॅडलेडच्या ओव्हलवर खेळला जात आहे. हा दिवस-रात्र सामना असून गुलाबी चेंडूने खेळवला जात आहे. या सामन्यात पॅट कमिन्सच्या जागी कर्णधार असलेल्या स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत गुलाबी चेंडूने ८ कसोटी सामने खेळले असून ते सर्व त्यांनी जिंकले आहेत. अ‍ॅडलेडमध्येही आपली विजयरथ मोहीम थांबू नये यासाठी ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील आहे. ब्रिस्बेनमधील गाबा येथे पहिली कसोटी नऊ गडी राखून जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीतही पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर ९५ धावांची खेळी करून बाद झाला, पण तंबूत परतताना त्याने सर्वांची मने जिंकली.

डेव्हिड वॉर्नरने बाद होण्यापूर्वी १६७ चेंडूत ११ चौकारांसह ९५ धावांची खेळी केली. पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना, वॉर्नरने स्टेडियममध्ये बसलेल्या मुलाला त्याचे ग्लोव्ह्ज भेट म्हणून दिले. वॉर्नरकडून ग्लोव्हज मिळाल्यानंतर हा मुलगाही खूप आनंदी दिसत होता. अशाप्रकारे शतक हुकलेल्या वॉर्नरने हा दिवस लहान मुलांसाठी खूप खास बनवला. वॉर्नरच्या या गोड कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा – VIDEO : सचिन तेंडुलकर BCCI मध्ये?; गांगुली म्हणतो, “यापेक्षा दुसरी चांगली बातमी…”

नाणेफेकीच्या तीन तास अगोदर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले, की बुधवारी रात्री एका रेस्टॉरंटमध्ये जेवणाच्या वेळी करोनाबाधित व्यक्तीच्या जवळ आलेला पॅट कमिन्स या सामन्यात खेळू शकणार नाही. मात्र, त्याची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा कर्णधार आहे. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्याबद्दल स्मिथला दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले.