Ashwell Prince Says Never seen a Newlands pitch like this : केपटाउनमध्ये खेळल्या जात असलेल्या भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी २३ विकेट पडल्या. येथे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला होता. यानंतर भारतीय संघही १५३ धावांवर सर्वबाद झाला. सामन्याच्या तिसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी ६२ धावा केल्यानंतर तीन विकेट गमावल्या होत्या. या सामन्यात सर्वाधिक फटका दक्षिण आफ्रिकेला बसला. घरच्या मैदानावर आपल्या संघाची ही अवस्था पाहून प्रोटीज संघाच्या फलंदाजी सल्लागारने खेळपट्टीबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजी सल्लागार अश्वेल प्रिन्स यांनी सांगितले की, न्यूलँड्सची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून इतकी वेगवान खेळपट्टी कधीच पाहिली नव्हती. खेळपट्टीवरील अनियमित उसळी आश्चर्यकारक असल्याचेही, ते म्हणाले. माजी क्रिकेटर म्हणाला, “मी या मैदानावर खूप क्रिकेट खेळलो आहे. प्रशिक्षक म्हणूनही मी येथे चांगला वेळ दिला आहे. पहिल्या दिवसापासून इतकी वेगवान खेळपट्टी मी कधीच पाहिली नाही. सामान्यत: सामन्याच्या दुसऱ्या दिवसापासून थोडा वेग पकडते. येथे फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्ण उसळीची आवश्यकता आहे, परंतु मला वाटते यावेळी खेळपट्टीवर अनियमित उसळी आहे.”
‘काही चेंडू खूप उंच उसळत होते..’
अश्वेल म्हणाले, “तुम्ही लक्षात घेतले असेल की काही चेंडू खूप उंच उसळत होते आणि काही चेंडू खूप खाली राहत होते. खेळपट्टीवर आदळल्यानंतर लेन्थ चेंडूही यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून जात होता. येथील प्रचंड बांधकाम प्रक्रियेमुळे खेळपट्टीवर परिणाम झाला आहे की आणखी काही कारण आहे, हे मला माहीत नाही. या खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या फलंदाजीला फलंदाजी करता आली नाही, यावरुन ही गोष्ट स्पष्ट होते.”
मोहम्मद सिराजने घेतल्या सर्वाधिक सहा विकेट्स –
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने १५ आणि डेव्हिड बेडिंगहॅमने १२ धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडन मार्करम (२४ धावा), डीन एल्गर (१७ धावा), टोनी डी जॉर्जी (१२ धावा), ट्रिस्टन स्टब्स (१२ धावा), मार्को जॅनसेन (० धावा), केशव महाराज (१ धाव), कागिसो रबाडा (१ धाव), नांद्रे बर्जर बाद (४ धावा).
हेही वाचा – IND vs SA 2nd Test : पहिल्याच दिवशी २३ विकेट्स; केपटाऊनवर विकेट कल्लोळ
विराट कोहलीने केल्या सर्वाधिक ४६ धावा –
भारताचा पहिला डाव १५३ धावांवर आटोपला. भारताचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार रोहितने ३९ धावांची खेळी खेळली. शुबमन गिलने ३६ आणि विराट कोहलीने सर्वाधिक ४६ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त फक्त लोकेश राहुलला खाते उघडता आले. त्याने आठ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार यांना खाते उघडता आले नाही. मात्र, मुकेशला एकाही चेंडूचा सामना करावा लागला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्जर यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला. पहिल्या डावाच्या आधारे भारताला ९८ धावांची आघाडी मिळाली.