आयसीसी क्रमवारीत दुसरे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना कसोटी मालिकेत आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणाऱ्या भारताच्या रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या क्रमवारीत गरुडझेप घेतली आहे. कसोटी गोलंदाजांच्या यादीत अश्विन तीन स्थानांच्या सुधारणेसह दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. दुसरीकडे मात्र आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज ए बी डी’व्हिलियर्सला सातत्याने आलेल्या अपयशाचा फटका बसला आहे. त्याला कसोटी फलंदाजांमधील अव्वल स्थान गमवावे लागले आहे.
अश्विनने द. आफ्रिकेविरुद्धच्या नागपूर येथील तिसऱ्या कसोटीत ९८ धावांत १२ बळी घेऊन भारताला १२४ धावांनी विक्रमी विजय मिळवून दिला. दिल्लीत होणारी चौथी कसोटी जिंकल्यास भारत कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर विराजमान होणार आहे. अश्विनने पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. त्यामुळे इंग्लंडचा जेम्स अ‍ॅण्डरसन आणि पाकिस्तानचा यासीर शाह यांना ८४६ गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड (८४०) पाचव्या स्थानावर गेला आहे. डेल स्टेनने (८८४) अव्वल स्थान कायम राखले आहे.
ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जोश हेझलवूडने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वोत्तम खेळ करत दहा स्थानांची मोठी उडी मारली आहे. त्याने क्रमवारीत दहावे स्थान पटकावले आहे. अमित मिश्रा ३१व्या, तर इम्रान ताहीर ३५व्या स्थानावर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा