पीटीआय, दुबई : फिरकी गोलंदाजी ही भारतीय संघाची ताकद आहे. त्यामुळे आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात भारताने रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोनही फिरकीपटूंना अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान द्यावे, असे मत माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
‘डब्ल्यूटीसी’चा अंतिम सामना ७ ते ११ जून या कालावधीत इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०२१मध्ये ओव्हल मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना जिंकला होता. त्यावेळी जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजांनी चमक दाखवली होती. आता ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात बुमराच्या अनुपस्थितीचा भारताला फटका बसेल असे शास्त्री यांना वाटते. मात्र, त्याची उणीव भरून काढण्यासाठी भारताने दोन फिरकीपटूंसह खेळले पाहिजे, असे शास्त्री यांनी नमूद केले.
‘‘गेल्या इंग्लंड दौऱ्यात भारताने चांगली कामगिरी केली होती. मात्र, भारताला हे यश बुमरा, शमी, शार्दूल, सिराज यांच्यामुळे मिळाले होते. भारताकडे चार उत्कृष्ट गोलंदाज होते आणि यापैकी शार्दूल अष्टपैलू आहे. इंग्लंडमध्ये यश मिळवण्यासाठी हे सर्वोत्तम समीकरण आहे. यामुळे कर्णधार म्हणून रोहित शर्माला सामन्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. इंग्लंडमधील वातावरण अचानक ढगाळ होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत अतिरिक्त वेगवान गोलंदाज संघासाठी फायदेशीर ठरतात,’’ असे शास्त्री म्हणाले.
गेल्या इंग्लंड दौऱ्याला आता दोन वर्षे झाली आहेत. या काळात भारताच्या वेगवान गोलंदाजांचे वयही वाढले आहे. त्यामुळे आता भारताने एका वेगवान गोलंदाजाला वगळून अतिरिक्त फिरकीपटूला खेळवण्याबाबत विचार केला पाहिजे असे शास्त्री यांना वाटते. ‘‘दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता स्थिती वेगळी आहे. तुमच्या वेगवान गोलंदाजांचे वय वाढले आहे आणि ते पूर्वीइतक्या वेगाने गोलंदाजी करत नाहीत, असे वाटत असल्यास भारताने दुसऱ्या फिरकीपटूला संघात स्थान देणे गरजेचे आहे. अश्विन आणि जडेजा हे गुणवान फिरकीपटू आहेत. कोणत्याही परिस्थितीत यशस्वी ठरण्याची त्यांच्यात क्षमता आहे,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.