R Ashwin Reacts on Rejection In World Cup Finals: भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये खेळण्याची संधी न मिळण्यावरून एका मुलाखतीत भाष्य केले आहे. या निर्णयाबाबत रोहित शर्माचं नाव घेत अश्विनने मनातील भावना बोलून दाखवल्या. अश्विनने भारताचा माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथ यांच्याशी त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, मला रोहितची स्थिती आणि विचार समजू शकतात. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात मला न खेळवण्याचा हेतू काय होता याविषयी मला कोणतीही शंका नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या फिरकीपटूने सांगितले की, “रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनचा संघ तयार करताना शंभर वेळा विचार केला असेल, आणि हा संघ खरोखरच उत्तम खेळत होता. अशावेळी कोणीही त्यांचं विजयी कॉम्बिनेशन का बदलेल. राहिला प्रश्न माझा तर मी फायनल खेळतो का किंवा संघामध्ये कोण कोण असणार हे सर्व दुय्यम प्रश्न आहेत, मुख्य मुद्दा आहे सहानुभूतीचा, मी नेहमीच याविषयी सांगत असतो तुम्ही स्वतः दुसऱ्याच्या जागी ठेवून मग एखाद्या गोष्टीकडे पाहणं सुद्धा आवश्यक असतं. उद्या जर मी रोहितच्या जागी असतो तर मी विजयी कॉम्बिनेशन बदलण्याचा १०० वेळा विचार केला असताच. तसंही एका वेगवान गोलंदाजाला विश्रांती देऊन ३ फिरकीपटूंना खेळवल्याने काय साध्य झालं असतं? “

अंतिम सामन्यात डावलण्याबाबत अश्विन सांगतो की, “प्रामाणिकपणे, मी रोहित शर्माची विचारप्रक्रिया समजू शकतो. फायनल खेळणे ही एक मोठी संधी आहे. मी ३ दिवस त्याची तयारी करत होतो. मी फार कोणाशी बोलतही नव्हतो, काही व्हॉट्सअॅप मेसेजचे नोटिफिकेशन मी वाचले पण अन्यथा फोन दूर ठेवला होता, मी स्वतःला तयार करतच होतो पण मी सामन्यात नसलो तरी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वेळ पडल्यास इलेक्ट्रॉल घेऊन मैदानात खेळाडूंना द्यायला जाण्यासाठीही मी मानसिक तयारी ठेवली होती.”

हे ही वाचा<< “धोनी सर्वोत्कृष्ट कर्णधार आणि रोहित शर्मा..”, विश्वचषकानंतर अश्विनचं मोठं विधान, म्हणाला, “संघातील प्रत्येकालाच..”

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत अश्विन चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक सामना खेळला होता आणि त्यात त्याने ३४ धावांत एक बळी घेतला होता. पहिल्या सामन्यानंतर फिरकीपटूला राखीव ठेवण्यात आले होते. परंतु अहमदाबादमधील विकेट पीचच्या संथ स्वरूपामुळे अश्विन संघात येऊ शकतो अशी चर्चा सुरु होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashwin straight forward reply on world cup finals dispute understood why rohit sharma did not want me to play ind vs aus svs