पीटीआय, मनिला (फिलिपाइन्स)
भारताची तारांकित बॅडिमटनपटू पीव्ही सिंधूला आशिया अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुचीविरुद्धच्या लढतीदरम्यान पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा मला फटका बसला आणि माझा अंतिम फेरीत खेळण्याचा हक्क हिरावून घेतला गेला, अशी भावना सिंधूने व्यक्त केली आहे. यावेळी सिंधूचे डोळेही पाणावले.
उपांत्य फेरीत सिंधूला यामागुचीकडून २१-१३, १९-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. पहिला गेम जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधू १४-११ अशी आघाडीवर होती. त्यावेळी सव्‍‌र्हिस करण्यापूर्वी तिने बराच वेळ घेतल्याने पंचांनी दंडस्वरूपात प्रतिस्पर्धी यामागुचीला एक गुण बहाल केला. यानंतर सिंधूची लय बिघडली. तिने दुसरा गेम १९-२१ असा अवघ्या दोन गुणांच्या फरकाने गमावला. त्यानंतर तिसऱ्या गेममध्येही तिला पुनरागमन करता आले नाही. त्यामुळे सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
‘‘मी सव्‍‌र्हिसपूर्वी बराच वेळ घेत असल्याचे पंचांनी मला सांगितले. मात्र, प्रत्यक्षात प्रतिस्पर्धी खेळाडू त्यावेळी पूर्णपणे तयार नव्हती. असे असतानाही पंचांनी अचानक तिला एक गुण बहाल केला आणि ही गोष्ट अनुचित होती. माझ्या पराभवामागे हेसुद्धा एक कारण होते,’’ असे सिंधू म्हणाली. ‘‘दुसऱ्या गेममध्ये मला १५-११ अशी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, पंचांनी एक गुण प्रतिस्पर्धीला दिल्याने माझी आघाडी १४-१२ अशी कमी झाली. कदाचित मी सामना जिंकू शकले असते आणि अंतिम फेरीत प्रवेश करू शकले असते. मी मुख्य पंचांशी संवाद साधला, पण त्यांचा निर्णय अंतिम असल्याचे त्यांनी मला सांगितले,’’ असेही सिंधूने नमूद केले.
सिंधूला यंदा सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास होता. त्यात अपयश आल्याने ती खूप निराश आहे. मी तिच्याशी बोललो, तेव्हा तिला रडू कोसळले. मात्र, जे झाले ते विसरून पुढचा विचार करण्याचा मी तिला सल्ला दिला. पंचांनी जे केले ते योग्य नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • पीव्ही रमन्ना, सिंधूचे वडील
  • पीव्ही रमन्ना, सिंधूचे वडील