दुबई : भारताच्या लक्ष्य सेनचे आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. मात्र, पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी सहज विजय मिळवून महिला व पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अशीच कामगिरी महिला दुहेरीत ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद जोडीने केली.
राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या ट्रिसा-गायत्री जोडीने पिछाडीवरून मुसंडी मारताना इंडोनेशियाच्या त्रिया मायासारी-रिब्का सुगिआर्तो जोडीचे आव्हान ७-२१, २१-१७, २१-१८ असे मोडून काढले.माजी जगज्जेती सिंधूने ४६ मिनिटांत वेन ची सु हिचा २१-१५, २२-२० असा पराभव केला. पुरुष एकेरीत श्रीकांतने अदनान इब्राहिमला केवळ २५ मिनिटांत २१-१३, २१-८ असे नमवले.
अपयशातून बाहेर पडण्यासाठी स्पर्धात्मक कार्यक्रमापासून दूर राहून सरावावर लक्ष केंद्रित करणाऱ्या लक्ष्य सेनचे पुनरागमन अपयशी ठरले. लोह कीन येऊने लक्ष्यचे आव्हान २१-७, २३-२१ असे परतवले. महिला एकेरीत मालविका बनसोडला जपानच्या गतउपविजेत्या अकाने यामागुचीकडून २३-२५, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. इंडोनेशियाच्या कोमांग आयू काहयाकडून आकर्षी कश्यप २१-६, २१-१२ अशी पराभूत झाली.