साखळी गटाच्या तीनपैकी तीन लढती जिंकत श्रीलंकेने दिमाखात आशिया चषकाची अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतील स्थान पक्के झालेला श्रीलंकेचा संघ निर्धास्तपणे बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या साखळी लढतीत सराव करणार आहे. महेला जयवर्धनेला सूर गवसलेला नाही. त्याच्यासाठी हा सामना चांगली संधी आहे.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कुमार संगकारासाठी वर्चस्व गाजवण्याचा सामना असेल. युवा फलंदाजांना अंतिम लढतीपूर्वी कौशल्य सिद्ध करण्याची सुयोग्य संधी आहे.
अंतिम लढतीपूर्वी लसिथ मलिंगा, अजंथा मेंडिस आणि सचित्र सेनानायके यांना सराव करता येईल. दुसरीकडे घरच्या मैदानात, पाठिराख्यांच्या जल्लोषभऱ्या समर्थनाच्या साक्षीने बांगलादेशला चाहत्यांचा सन्मान कमावण्याची संधी आहे. तिन्ही लढतींतील पराभव बाजूला ठेवून सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी बांगलादेशचा संघ सज्ज झाला आहे. शकीब उल हसन, मुशफिकर रहीम आणि अनामूल हक यांच्यावर बांगलादेशची भिस्त आहे.
संघ : श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, लहिरू थिरिमाने, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, थिसारा परेरा, चतुरंग डिसिल्व्हिा, दिनेश चंडिमल, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, अजंथा मेंडिस, अशान प्रियंजन, धम्मिका प्रसाद.
बांगलादेश : मुशफिकर रहीम (कर्णधार), अल अमिन होसेने, अराफत सनी, शफीऊल इस्लाम, नइम इस्लाम, रुबेल होसेन, शकीब उल हसन, झिआऊर रहमान, अब्दुर रझ्झाक, अनामूल हक, इम्रूल केयस, मोमिनुल हक, नासिर होसेन, शम्सूर रेहमान, सोहाग गाझी.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-३ वाहिनीवर.
सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून