स्पर्धेच्या निर्णायक सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला ३७ धावांनी पराभूत केले आणि इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मुशफिकूरची तडाखेबाज फलंदाजी आणि गोलंदाजांचा भेदक मारा याच्या बळावर बांगलादेशने पाकिस्तानला धूळ चारली. ९९ धावांची दमदार खेळी करणाऱ्या मुशफिकूर रहीम याला सामनावीर घोषित करण्यात आले. आता २८ सप्टेंबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात स्पर्धेच्या विजेतेपदाची झुंज रंगणार आहे.

नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. १२ धावांत बांगलादेशने ३ बळी गमावले. पण त्यानंतर मुशफिकूर आणि मोहम्मद मिथुन यांनी कर्णधाराचा प्रथम फलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवणारी १४४ धावांची भागीदारी केली. मुशफिकूरने सर्वाधिक ९९ धावा ठोकल्या. त्याने ९ चौकार लगावले. तर मोहम्मद मिथुनने ४ चौकारांसह ६० धावांची खेळी केली. या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने ५० षटकात २३९ धावा केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या डावाचीही सुरुवात वाईट झाली. १८ धावांत पाकिस्तानने ३ बळी गमावले. पण सलामीवीर इमाम उल हक याने एक बाजू लावून धरली. अनुभवी शोएब मलिक (३०) आणि असिफ अली (३१) या दोघांच्या साथीनं त्याने पाकिस्तानला विजयी धावसंख्या गाठून देण्याचा प्रयत्न केला. पण या साऱ्यांचेच प्रयत्न तोकडे पडले. इमामने ८३ धावा केल्या. या खेळीत केवळ २ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. या तिघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना आपली छाप उमटवता आली नाही.

Story img Loader