आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि बांगलादेश हे प्रतिस्पर्धी विजेतेपदासाठी लढणार आहेत. मात्र पाकिस्तानवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या बांगलादेशच्या संघाला आम्ही हलकं लेखण्याची चूक करणार नाही असं मत संघाचा उप-कर्णधार शिखर धवनने व्यक्त केलं आहे. अंतिम सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत शिखर धवनने संघाची भूमिका मांडली.
अवश्य वाचा – Asia Cup 2018 : ‘आशिया का किंग’ कौन? भारत-बांगलादेश आज अंतिम सामना
विराट कोहलीच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारला असता शिखर म्हणाला, “विराट संघात नसल्यामुळे आमच्या सगळ्यांवर एक अधिकची जबाबदारी होती. या स्पर्धेत आम्हाला आमची मधली फळी आजमावून घेण्याची चांगली संधी होती. यामधून कोणते खेळाडू भारताचं भविष्यात सक्षम प्रतिनिधीत्व करु शकतात याचा अंदाज येणार होता. त्यामुळे एकीकडे विराट कोहली संघात नसला तरीही मी आणि रोहित असल्यामुळे आम्ही जबाबदारीने खेळत होतो. याचसोबत स्पर्धेमध्ये तुमच्याकडून धावा होत असतील तर याच्यासारखी चांगली गोष्ट नाही.”
आशिया चषकात आतापर्यंत भारतीय संघ एकही सामना हरलेला नाहीये. Super 4 गटातील शेवटच्या सामन्यात भारताला अफगाणिस्तानविरुद्ध बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं. याव्यतिरीक्त पाकिस्तान, बांगलादेश, हाँग काँग या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर भारताने मात केली होती. त्यामुळे अंतिम फेरीत भारतीय संघ आपलं विजेतेपद कायम राखण्यात यशस्वी होतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.