रविंद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमारने मधल्या फळीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा अंतिम फेरीत ३ गडी राखून पराभव केला. आशिया चषकाचं भारताचं हे सातवं विजेतेपद ठरलं. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने बांगलादेशला २२२ धावांमध्ये गुंडाळलं. मात्र धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव मधल्या षटकांमध्ये काहीसा गडबडला. रोहित आणि शिखर या सलामीच्या जोडीने भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र शिखर व रायडू माघारी परतल्यानंतर रोहितने दिनेश कार्तिकसोबत छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र रोहित माघारी परतल्यानंतर धोनी आणि कार्तिक जोडीला धावांची गती राखता आली नाही.

चौथ्या विकेटसाठी धोनी-कार्तिक जोडीने अर्धशतकी भागीदारी केली खरी, मात्र यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी प्रचंड चेंडू खर्ची घातले. याचकाळात बांगलादेशच्या गोलंदाजांनी भारतावर दबाव आणून सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनीला माघारी धाडण्यात यश आल्यानंतर केदार जाधवही दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली. मात्र रविंद्र जाडेजाने भुवनेश्वर कुमारच्या साथीने किल्ला लढवत भारताचं आव्हान सामन्यात कायम राखलं. विजयासाठी ११ धावांची आवश्यकता असताना रविंद्र जाडेजा माघारी परतला. यानंतर ४९ व्या षटकात मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर भुवनेश्वर माघारी परतल्यामुळे भारताच्या अडचणीत आणखी भर पडली. मात्र यानंतर केदार जाधवने मैदानात येऊन कुलदीप यादवच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या बांगलादेशच्या लिटन दासला सामनावीराचा तर मालिकेत धावांचा रतीब घालणाऱ्या शिखर धवनला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

तत्पूर्वी सलामीवीर लिटन दासने झळकावलेलं शतक आणि मधल्या फळीत सौम्या सरकारने केलेल्या ३३ धावांच्या जोरावर बांगलादेशने अंतिम सामन्यात २२२ धावांपर्यंत मजल मारली. चांगली सुरुवात करुनही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे बांगलादेशचा संघ सामन्यात मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय रोहित शर्माच्या चांगलाच अंगलट आला. लिटन दास आणि मेहदी हसन यांनी पहिल्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. भारताच्या एकाही गोलंदाजाला ही जोडी फोडण्यात अपयश आलं, त्यामुळे रोहित शर्माने अखेर केदार जाधवच्या हाती चेंडू सोपवला.

केदारनेही रोहितचा विश्वास सार्थ ठरवत बांगलादेशची पहिली जोडी फोडली. यानंतर बांगलादेशच्या डावाची घसरगुंडी उडाली. एकामागोमाग एक फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या नादात विकेट टाकत माघारी परतायला लागले. याचा फायदा घेत भारताने सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. मधल्या फळीत सौम्या सरकार-कर्णधार मश्रफी मोर्तझाने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची डाळ जास्तवेळ टिकू शकली नाही. एका डावात बांगलादेशचे तब्बल ३ फलंदाज धावबाद होऊन माघारी परतले. गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादवने ३, तर केदार जाधवने २ बळी घेतले.

Live Blog

01:49 (IST)29 Sep 2018
केदार जाधव - कुलदीप यादव जोडीकडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब

अखेरच्या षटकात भारतीय जोडीकडून विजयावर शिक्कामोर्तब, केदार जाधवने काढली विजयी धाव.  बांगलादेशवर ३ गडी राखून मात भारत आशिया चषकाचा विजेता

01:12 (IST)29 Sep 2018
भुवनेश्वर कुमार माघारी, भारताला सातवा धक्का

मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर भुवनेश्वर झेलबाद, भारताचा सातवा गडी माघारी

01:06 (IST)29 Sep 2018
रविंद्र जाडेजा माघारी, भारताला सहावा धक्का

रुबेल हुसेनच्या गोलंदाजीवर जाडेजा माघारी, भारताला सहावा धक्का

01:05 (IST)29 Sep 2018
जाडेजा - भुवनेश्वरची संयमी भागीदारी, भारत विजयाच्या जवळ

केदार जाधव माघारी परतल्यानंतर जाडेजा-भुवनेश्वर जोडीने संयमी फलंदाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवलं

00:18 (IST)29 Sep 2018
केदार जाधव दुखापतीमुळे मैदानाबाहेर, भारताच्या चिंतेत वाढ

मधल्या फळीतला महत्वाचा फलंदाज केदार जाधव फलंदाजीदरम्यान दुखापतग्रस्त, धावा काढताना त्रास जाणवल्याने केदारचा मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय. संघाच्या चिंतेत वाढ

00:10 (IST)29 Sep 2018
धोनी माघारी, भारताला पाचवा धक्का

संथ खेळी करुन खेळपट्टीवर जम बसवू पाहणाऱ्या धोनीला बाद करण्यात बांदलादेशला यश, मुस्तफिजूर रेहमानच्या गोलंदाजीवर मुशफिकूरने घेतला झेल

23:39 (IST)28 Sep 2018
मेहमद्दुलाचा भारताला झटका, दिनेश कार्तिक माघारी

अतिशय संथ खेळी करणाऱ्या दिनेश कार्तिकला माघारी धाडण्यात बांगलादेश यशस्वी, मेहमद्दुलाच्या गोलंदाजीवर कार्तिक पायचीत

23:38 (IST)28 Sep 2018
धोनी-दिनेश कार्तिकमध्ये अर्धशतकी भागीदारी

चौथ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये भागीदारी, भारताचा डाव सावरला

22:34 (IST)28 Sep 2018
कर्णधार रोहित शर्मा माघारी, भारताला तिसरा धक्का

रुबेल हुसैनच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा माघारी, भारताचा तिसरा गडी तंबूत परतला

22:34 (IST)28 Sep 2018
रोहित-दिनेश कार्तिकमध्ये छोटेखानी भागीदारी

तिसऱ्या विकेटसाठी रोहित-कार्तिकमध्ये झालेल्या छोटेखानी भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला

21:53 (IST)28 Sep 2018
अंबाती रायडूची निराशा, भारताला दुसरा धक्का

मश्रफी मोर्ताझाच्या गोलंदाजीवर मुशफिकूरकडे झेल देत रायडू माघारी

21:53 (IST)28 Sep 2018
भारताला पहिला धक्का, शिखर धवन माघारी

नझमुल इस्लामच्या गोलंदाजीवर सौम्या सरकारकडे झेल देऊन शिखर धवन माघारी, भारताला पहिला धक्का

21:51 (IST)28 Sep 2018
भारतीय सलामीवीरांकडून आक्रमक सुरुवात

रोहित शर्मा - शिखर धवनची फटकेबाजी, भारताची आक्रमक सुरुवात

21:51 (IST)28 Sep 2018
रुबेल हुसेन माघारी, बांगलादेशचा डाव २२२ धावांमध्ये आटोपला

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर हुसेन त्रिफळाचीत. भारताला विजयासाठी २२३ धावांचं आव्हान

21:49 (IST)28 Sep 2018
बांगलादेशला नववा धक्का

सौम्या सरकार चोरटी धाव घेताना धावबाद

20:17 (IST)28 Sep 2018
बांगलादेशला आठवा धक्का

नझमुल इस्लाम चोरटी धाव घेताना धावबाद, आठवा गडी माघारी परतला

19:52 (IST)28 Sep 2018
अखेर कुलदीपने बांगलादेशची जोडी फोडली, लिटन दास माघारी

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर लिटन दास यष्टीचीत, बांगलादेशचा सहावा गडी बाद

19:52 (IST)28 Sep 2018
लिटन दास - सौम्या सरकारमध्ये छोटेखानी भागीदारी

सहाव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये झालेल्या भागीदारीमुळे बांगलादेशची २०० धावांकडे वाटचाल

19:08 (IST)28 Sep 2018
मेहमद्दुला माघारी, बांगलादेशचा पाचवा गडी बाद

चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशचा निम्मा संघ माघारी. मेहमद्दुला कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद

18:58 (IST)28 Sep 2018
अखेर सलामीवीर लिटन दासचं शतक

एका बाजूला फलंदाज धडाधड माघारी परतत असताना लिटन दासने दुसऱ्या बाजूने तग धरुन आपलं शतक साजरं केलं आहे. बांगलादेशची मदार लिटन दास आणि मेहमद्दुला जोडीवर

18:57 (IST)28 Sep 2018
बांगलादेशचा चौथा गडी माघारी, मोहम्मद मिथून धावबाद

चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मिथून धावबाद, बांगलादेशला चौथा धक्का

18:46 (IST)28 Sep 2018
केदार जाधव पुन्हा एकदा चमकला, मुशफिकूर रहिमला धाडलं माघारी

केदार जाधवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात मुशफिकूर रहीम बुमराहकडे झेल देत माघारी

18:36 (IST)28 Sep 2018
बांगलादेशला दुसरा धक्का, इमरुल कायस माघारी

युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर कायस बाद, बांगलादेशचा दुसरा गडी माघारी

18:24 (IST)28 Sep 2018
अखेर केदार जाधवने बांगलादेशची जोडी फोडली, मेहदी हसन माघारी

भारताने हक्काचे गोलंदाज अपयशी ठरत असल्याचं पाहून कर्णधार रोहित शर्माने केदार जाधवला गोलंदाजीसाठी पाचारण केलं. केदारच्या गोलंदाजीवर मेहदी हसन अंबाती रायडूकडे झेल देऊन माघारी. बांगलादेशला पहिला धक्का

18:10 (IST)28 Sep 2018
बांगलादेशने ओलांडला १०० धावांचा टप्पा

लिटन दास आणि मेहदी हसन या जोडीने सलामीला येत शतकी भागीदारी करत बांगलादेशला भक्कम सुरुवात करुन दिली आहे.

17:51 (IST)28 Sep 2018
लिटन दासचं अर्धशतक

सलामीवीर लिटन दासने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतक झळकावलं आहे. बांगलादेशची आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल

17:39 (IST)28 Sep 2018
बांगलादेशी सलामीवीरांची आक्रमक सुरुवात

मेहदी हसन आणि लिटन दास जोडीने आक्रमक सुरुवात करत भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल चढलवला आहे.  दोघांनीही पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे.

16:44 (IST)28 Sep 2018
भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

अंतिम सामन्यात रोहित शर्मा नाणेफेक जिंकण्यात यशस्वी, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Story img Loader