आशिया चषकात रोहित शर्माने ज्या पद्धतीने भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे, ते पाहून भारताचे माजी खेळाडू सुनिल गावसकर चांगलेच प्रभावित झाले आहेत. कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे रोहित शर्माची फलंदाजी अधिक चांगली झाली असल्याचं मत गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. आशिया चषकाआधी रोहित शर्माने १२ वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे, यात भारताला फक्त २ पराभवांना सामोरं जावं लागलं आहे.
“आयपीएलमध्ये पहिल्यांदा रोहितने मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं होतं, त्यावेळीच रोहितने आपल्यातले नेतृत्वगुण दाखवून दिले होते. सामन्याआधी ड्रेसिंगरुममध्ये रणनिती ठरवली जाते, मात्र प्रत्यक्ष मैदानात तुमचे डावपेच उलटू शकतात. याच कारणासाठी तुमचा कर्णधार त्वरित निर्णय घेणारा असावा लागतो.” India Today वृत्तसुमहाला दिलेल्या मुलाखतीत गावसकर बोलत होते.
अवश्य वाचा – Asia Cup 2018 : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ‘गब्बर’चा अनोखा विक्रम, दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान
आशिया चषकात आतापर्यंतच्या सामन्यांमध्येही रोहित शर्माने संयम ठेऊन संघाचं कर्णधारपद सांभाळता येतं हे दाखवून दिलं आहे. कर्णधारपदाच्या जबाबदारीसोबतच तो फलंदाजीही तितक्याच प्रगल्भतेने करतो आहे, या गोष्टीचा त्याला फायदाच होईल, असंही गावसकर म्हणाले. याचसोबत गावसकर यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन केलेल्या जाडेजाचंही कौतुक केलं. जाडेजा हा एक उत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आहे. त्यामुळे निवड समिती त्याच्याबद्दल काय विचार करते हे पाहणं महत्वाचं असेल असंही गावसकर म्हणाले.