भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सध्याच्या भारतीय संघातील मधल्या फळीतल्या फलंदाजीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विराट कोहलीला भारतीय संघातून वगळल्यास भारताची फलंदाजी अगदी सामन्य होते, असंही सौरव गांगुली म्हणाला आहे. याचसोबत लोकेश राहुलला संघात जागा मिळत नसल्याबद्दलही त्याने नाराजी व्यक्त केली, अंबाती रायडू-दिनेश कार्तिक सारख्या फलंदाजांना संधी देण्याऐवजी लोकेश राहुल-ऋषभ पंत सारख्या फलंदाजांना संधी देणं गरजेचं असल्याचंही गांगुली म्हणाला.
“२०१९ चा विश्वचषक अगदी जवळ आलेला आहे, आणि अजुनही भारताची फलंदाजी अजुनही स्थिर झालेली नाही. विराटला संघातून वगळलं तर भारतीय फलंदाजी अगदीच सामान्य दिसते. दिनेश कार्तिकची कारकिर्द आता अखेरच्या टप्प्यात आहे, महेंद्रसिंह धोनीही पहिल्यासारख्या फॉर्ममध्ये जाणवत नाही. केदार जाधव-अंबाती रायडूसारखे फलंदाज संघात येऊन जाऊन आहेत. त्यामुळे भारतीय निवड समिती नेमका काय प्रयोग करतेय हे कळतं नाही.” इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने आपली भूमिका स्पष्ट केली.
संघातील प्रत्येक खेळाडू विजयासाठी आटोकाट प्रयत्न करतोय, त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर आहेच. पण माझ्या मते दिनेश कार्तिक ऐवजी लोकेश राहुलला संघात जागा मिळणं गरजेचं आहे. इंग्लंडमध्ये कार्तिकला धावा करता आल्या नाही हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी संघ बांधायचा असल्यास दिनेश कार्तिकऐवजी लोकेश राहुल आणि ऋषभ पंतचं नाव पुढे असायला हवं. लोकेश राहुल सध्या चांगल्याच फॉर्मात असल्यामुळे त्याचं संघात असणं गरजेचं असल्याचंही गांगुली म्हणाला.