प्रथमेश दीक्षित सगळं काही आलबेल झालं, केदार जाधवने अखेरच्या चेंडूवर एक धाव काढली आणि भारताने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत बांगलादेशवर ३ गडी राखून मात केली. मात्र विजयासाठी बांगलादेशने दिलेलं २२३ धावांचं आव्हान पूर्ण करताना भारताला शेवटच्या चेंडूपर्यंत का बरं खेळावं लागलं असेल?? एरवी भारतीय खेळपट्ट्यांवर धावांचा पाऊस पाडणारे भारतीय फलंदाज महत्वाच्या सामन्यात एवढा अटीतटीचा खेळ का बरं खेळत असतील. भारताचं नशिब चांगलं म्हणून रविंद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमार जोडीने चांगली भागीदारी रचून संघाला विजयाच्या दिशेने नेलं, नाहीतर अंतिम सामन्याचा निकाल काही वेगळाच लागू शकला असता. अंतिम सामन्यात दिनेश कार्तिक आणि विशेषकरुन महेंद्रसिंह धोनीने केलेल्या संथ खेळीनंतर, एक गोष्ट नक्की होते ती म्हणजे आगामी विश्वचषकात एक फलंदाज म्हणून तुम्ही धोनीवर विसंबून राहु शकत नाही.
भारतीय लोकांना प्रत्येक बाबतीत एका देवाची गरज असते, क्रिकेटमध्ये इतकी वर्ष सचिन तेंडूलकरने कोट्यवधी लोकांच्या अपेक्षा खांद्यावर वाहिल्या. आता हे काम महेंद्रसिंह धोनी करतो आहे. मैदानावरचा खेळाडू हा कोणी दैवी चमत्कार नसून तो एक माणूस आहे, आणि माणूस कधी ना कधी थकू शकतो हे धोनीच्या चाहत्यांना समजलच नाहीये. मी आज मुद्दाम धोनीची आकडेवारी देणार नाही, कारण तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यापेक्षा जे समोर दिसतंय त्यावर चर्चा करायला किंवा लिहायला मला आवडेल. काही वर्षांपूर्वी धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट फिनीशर फलंदाज होता. मात्र वयाची ३५ वर्ष ओलांडल्यानंतरही धोनी संघात आपली जागा कायम राखून आहे, याचं एकमेव कारण म्हणजे त्याचं यष्टीरक्षण. गेल्या एक ते दीड वर्षाच्या काळात धोनीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला सामना जिंकून दिलाय अशी मोजकी उदाहरण तुम्हाला पहायला मिळतील.
मध्यंतरी धोनीच्या निवृत्तीची चर्चा चांगलीच रंगली होती, चॅम्पियन्स ट्रॉफीत हरल्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातील एका वन-डे सामन्यात भारत पराभूत झाला होता. त्या सामन्यातही धोनीच्या संथ खेळीवर खापर फोडण्यात आलं होतं, जे योग्यचं होतं. यानंतर निवड समितीनेही धोनीला पर्याय शोधणं गरजेचं असल्याचा सूचक इशारा दिला होता. मात्र कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या पाठींब्यामुळे धोनीच्या निवृत्तीची चर्चा मागे पडली. प्रत्येक खेळाडूला एक वय असतं, ते उलटून गेल्यावर मनासारखा खेळ होत नाही. दुर्दैवाने धोनीची गेल्या वर्ष ते दीड वर्षातली फलंदाजी हेच सांगतेय की धोनीतला फलंदाज आता संपलाय, त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही.
अवश्य वाचा – Asia Cup 2018 Final : महेंद्रसिंह धोनीचा आणखी एक विक्रम, दिग्गज यष्टीरक्षकांच्या पंक्तीत मिळवलं स्थान
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात जिकडे भारताचे आघाडीचे ४ फलंदाज हे माघारी परतले आहेत अशावेळी धोनीकडून कशाप्रकारच्या खेळाची अपेक्षा भारतीय चाहत्यांनी करायला हवी? अर्थातच चौफेर फटकेबाजी करुन प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर ढकलून सामना जिंकवून देणारी….मात्र गरज असताना धोनीसारख्या फलंदाजाने ६७ चेंडूत ३६ धावा करणं हे अपेक्षितच नाही. बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकनेही अशाच प्रकारची संथ खेळी केली. या दोन्ही फलंदाजांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली खरी, मात्र या खेळीदरम्यान दोन्ही फलंदाजांनी जो काही संथ खेळ केला त्यामुळेच शेवटच्या १० षटकात बांगलादेशचा संघ भारताला वरचढ ठरला.
अवश्य वाचा – भारताकडून बांगलादेशी वाघांची शिकार, आशिया चषकावर भारताची ‘सत्ता’!
यष्टीरक्षणात धोनी हा अजुनही बाप माणूस आहे. त्याची मैदानातली समयसूचकता, धावबाद करताना चेंडूचा अचूक अंदाज घेणं, यष्टीचीत करताना समोरच्या फलंदाजाला कळायच्या आत यष्टी उडवणं हे सर्व प्रकार धोनी आजही एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल अशा करतो. त्याच्या या गुणाबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारणच नाही, धोनी हा चांगला यष्टीरक्षक आहे म्हणून इतर यष्टीरक्षक तयार करायचे नाहीत किंवा नवीन तरुण यष्टीरक्षकांना संधीच द्यायची नाही असा नियम आहे का?? चॅम्पियन्स ट्रॉफीत सामना हरल्यानंतर ऋषभ पंतला संघात जागा मिळायला हवी अशी ओरड सुरु होती, तेव्हाकुठे त्याला संघात जागा मिळायला २०१८ साल उजाडलं. २०१९ पर्यंत धोनी संघातून निवृत्ती घेईल अशी शक्यताही नाही. २०१९ नंतरच ऋषभ पंत किंवा अन्य खेळाडूला संघात जागा मिळू शकते, पण केवळ धोनी आहे म्हणून इतर खेळाडूंना संधी द्यायची नाही ही भूमिका तितकीशी पटत नाही.
धोनीचे चाहते आणि मोदींचे चाहते यांच्यात मला फारसा फरक वाटत नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याबद्दल चांगलं बोलत असता तोपर्यंत ते तुम्हाला डोक्यावर उचलून धरतील. पण त्यांच्याविरुद्ध एक अवाक्षर निघालं की तुमची उद्धारगत झालीच म्हणून समजा. असो, तो मुद्दा नाही…पण धोनी…धोनी असं ओरडत असताना तो ही माणूसच आहे आणि तो ही कधी ना कधी थकणार हे त्याचे चाहते म्हणून आपण विसरता कमा नये.
अवश्य वाचा – Asia Cup 2018 Final : पाकिस्तानचे ‘बशीर चाचा’ रंगले भारतीय रंगात