आशिया चषक स्पर्धा दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आशिया चषक खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान २८ ऑगस्ट रोजी सामना रंगेल. त्यामुळे भारत-पाकिस्तानच्या सामन्यासाठीची तिकीट विक्री सुरू होताच, चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या आहेत. तिकिटांची वाढती मागणी बघता काळाबाजर तेजीत सुरू झाला आहे.

क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान संघर्ष बघणे, ही क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. आशिया चषकानिमित्त लवकरच चाहत्यांना दोन्ही देशांचा सामना बघण्याची संधी मिळणार आहे. सामना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तिकिटांची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेऊन काही चाहत्यांनी तिकिटांची पुनर्विक्री करून काळाबाजार सुरू केला आहे. काही चाहते दुप्पट-तिप्पट किंमतीला भारत-पाक लढतीची तिकीटे विकत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा – Asia Cup 2022: बापरे.. ‘या’ सामन्याच्या तिकीटांना मागणी एवढी की वेबसाईटच झाली क्रॅश

भारत-पाकिस्तान लढतीच्या तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याचे लक्षात येताच, अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. यूएईमधील सर्वात लोकप्रिय वेबसाइटपैकी एक असलेल्या ‘प्लॅटिनमलिस्ट डॉट नेट’ (platinumlist.net) याठिकाणी अधिकृत तिकीट विक्री सुरू आहे. प्लॅटिनम लिस्टने म्हटले आहे की, ‘सरकारी नियमांनुसार तिकीटांची पुनर्विक्री बेकायदेशीर आहे. अशी तिकीटे आढळल्यास ती आपोआप रद्द होतील.’

प्लॅटिनम लिस्टने खलीज टाईम्सच्या माध्यमातून सांगितले, “ग्राहकांना तथाकथित दुय्यम तिकीट विक्री वेबसाइट किंवा पुन्हा विकली जाणारी तिकीटे खरेदी करू नयेत. अशी तिकीटे मैदानात प्रवेश घेण्यासाठी वैध नसतील. याशिवाय, जर एखाद्या ग्राहकाने एकाच सामन्यासाठी एकापेक्षा जास्त तिकिटे खरेदी केली असतील, तर त्याने किंवा त्याच्यासोबतच्या लोकांनी मैदानात एकत्र प्रवेश केला पाहिजे.”

हेही वाचा – “मेरा पिछा छोडो बहन”; सोशल मीडियावर रंगला ऋषभ पंत अन् उर्वशी रौतेलाचा वाद

आशिया चषकाच्या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडतील. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये आहेत. ग्रुप स्टेजच्या सामन्यांनंतर ‘सुपर फोर’ टप्पा असेल आणि सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील.

Story img Loader