यूएईमध्ये सुरू असलेली आशिया चषक स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये खेळवला जाणारआहे. याच दोन संघांमध्ये ९ सप्टेंबर रोजी सुपर-४ फेरीतील अंतिम सामनादेखील खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यातील एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह प्रेक्षकांचे मोबाईल स्वत:च्या खिशात घालताना दिसत आहे.
हेही वाचा>>> उर्वशी रौतेलाच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूने अखेर दिली प्रतिक्रिया, म्हणाला “मी तिला…”
९ सप्टेंबर रोजी खेळवल्या गेलेल्या श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान या सुपर-४ फेरीतील अंतिम सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह प्लेइंग ११ चा भाग नव्हता. या सामन्यादरम्यान त्याला आराम देण्यात आला होता. एकीकडे सामना सुरू असताना तो त्याच्या चाहत्यांसोबत वेळ घालवत होता. यावेळी अनेकांनी त्याच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर नसीम शाहने चाहत्यांचे फोन घेतले. हातामध्ये फोन बसेनासे झाल्यानंतर आपल्या पँटच्या खिशातही मोबाईल टाकले. त्याने केलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा>>> पाकिस्तान-श्रीलंका अंतिम लढतीत कोण बाजी मारणार? ‘ही’ बाब ठरणार महत्त्वपूर्ण; भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने केले भाकीत
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. अनेकांनी नसीम असे का करतोय, असे विचारले. काही वेळाने नसीम शाहने चाहत्यांना त्यांचे मोबाईल फोन परत केले. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेसमोर विजयासाठी १२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रीलंकेने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली होती. आता याच दोन संघांमध्ये आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.