Jay Shah-Zaka Ashraf Meeting: आशिया चषकाबाबत सातत्याने वाद होत आहेत. आता पुन्हा एकदा वेळापत्रकाला विलंब झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेऊन परिस्थितीबाबत चर्चा केली. वृत्तानुसार, पीसीबीचे नवे प्रमुख श्रीलंकेसोबत यजमानपदाचे अधिकार शेअर करण्याबद्दल खूश नाहीत. यावेळी आशिया चषक पाकिस्तानातच व्हावा, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे हायब्रीड मॉडेलवर पुन्हा विचार होणार? क्रिकेट वर्तुळात याची चर्चा सुरु झाली आहे.
या आठवड्यात वेळापत्रक जाहीर होणार होते
आशिया चषकाबाबत बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये वाद सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषक २०२३ वर पुन्हा यू-टर्न घेतला आहे. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यात परिस्थितीवर चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा होणार आहे. वास्तविक, झका अश्रफ नुकतेच पीसीबीचे नवे प्रमुख झाले. मात्र आशिया कपच्या प्रस्तावित वेळापत्रकावर ते खूश नसल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तान व्यतिरिक्त आशिया चषक २०२३ श्रीलंकेत खेळवला जाईल, परंतु पीसीबीची नवीन मागणी आहे की स्पर्धेचे सर्व सामने पाकिस्तानच्या भूमीवर खेळले जावेत.
या आठवड्यात वेळापत्रक जाहीर होऊ शकते, असे मानले जात होते. आता पीसीबी आणि बीसीसीआयमध्ये चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात आणखी काही बदल पाहायला मिळू शकतात. पाकिस्तानचे क्रीडा मंत्री एहसान मजारी यांनी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास नकार दिला आहे. पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी हायब्रीड मॉडेल एसीसीला सादर केले.
एहसान मजारी काय म्हणाले?
एहसान मजारी यांनी एका मीडिया संस्थेशी संवाद साधताना सांगितले “पाकिस्तान हा यजमान आहे, त्याला सर्व सामने पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा अधिकार आहे. क्रिकेटप्रेमींना हेच हवे आहे पण मला हायब्रीड मॉडेल नको आहे. पीसीबी माझ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने, माझे वैयक्तिक मत आहे की जर भारताने आपले आशिया चषक सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली, तर आम्ही भारतातील आमच्या विश्वचषक सामन्यांसाठीही तशी मागणी करू.”
माहितीसाठी की, यावेळी आशिया कपचे आयोजन पाकिस्तानने केले होते. पण बीसीसीआयने संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला. यानंतर पीसीबीचे तत्कालीन प्रमुख नजम सेठी यांनी एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेला हायब्रीड मॉडेल ऑफर केले. ज्यावर बीसीसीआयने सहमती दर्शवली.
हायब्रिड मॉडेल काय आहे
या हायब्रीड मॉडेलनुसार, पाकिस्तान संघ बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि अफगाणिस्तानविरुद्ध पहिले चार सामने खेळणार आहे. यानंतर सर्व संघ श्रीलंकेला जातील. जिथे भारत विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध इतर सामने होतील. ही स्पर्धा ३१ ऑगस्टपासून सुरू होणार होती आणि १७ सप्टेंबरला अंतिम सामना होणार होता.