SL vs AFG, Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ५ सप्टेंबर रोजी झालेल्या रोमहर्षक सामन्यात दोन्ही संघांमध्ये निकराची लढत पाहायला मिळाली. मात्र, हा सामना सह-यजमान श्रीलंकेने जिंकला आणि त्याबरोबरच अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला. श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने हा रोमांचक सामना अवघ्या दोन धावांनी जिंकून आशिया चषक २०२३च्या सुपर-४ मध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा या स्पर्धेतील प्रवास या पराभवाने संपला. अफगाणिस्तानचा संघ सामना गमावूनही सध्या खूप चर्चेत आहे. सामन्यानंतरचा राशिद खानचा भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिया चषक २०२३ मधील आतापर्यंतचा सर्वात प्रेक्षणीय आणि अटीतटीचा सामना मंगळवारी (5 सप्टेंबर) लाहोरमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात, अफगाणिस्तान संघ विजयासाठी आवश्यक असलेल्या नेट रन नेट (NRR) च्या हिशोबात अडकला आणि शेवटी पराभव पत्करावा लागला.

अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी सामन्यानंतर मान्य केले की, त्यांचा संघ या गणिताबद्दल अनभिज्ञ होता. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ट्रॉट म्हणाले की, “सामना अधिकाऱ्यांनी त्यांच्या संघाला नेट रन नेट बद्दल माहिती दिली नव्हती. असे दिसते की, अफगाणिस्तानला हे माहित नव्हते की ते पात्र होण्यासाठी निर्धारित ३७.१ षटकांपेक्षा जास्त चेंडू वापरू शकतात. ट्रॉट पुढे म्हणाले, “आम्हाला समीकरणाबद्दल कधीच सांगितले गेले नाही, फक्त एवढेच सांगितले गेले की सुपर फोरसाठी पात्र होण्यासाठी आम्हाला ३७.१ षटकांत विजय मिळवायचा आहे. मात्र, ती कोणती षटके आहेत हे सांगितले गेले नाही, ज्यामध्ये आम्ही २९५ किंवा २९७ धावा करू शकलो असतो. आम्हाला ३८.१ षटके असं सांगितलेलं नाहीत.”

हेही वाचा: Asia Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आरोपांवर जय शाहांचे सडेतोड उत्तर; माजी PCB प्रमुखांना म्हणाले, “कोणताच संघ तुमच्या देशात…”

या सामन्यात अफगाणिस्तानला २९२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ ३७.४ षटकांत २८९ धावा करून सर्वबाद झाला. शेवटी, विकेटवर नाबाद असलेल्या राशिद खानचा (१६ चेंडू, २७* धावा) उदास चेहरा अफगाणिस्तानच्या पराभवाची कहाणी स्पष्टपणे सांगत होता. त्याचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

राशिद खानने सामन्यानंतर एक ट्वीट केले आहे. त्यात तो म्हणतो की, “क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे काहीही घडू शकते. यासारख्या खेळात असे अनेक चढउतार येत असतात. त्यामुळे यात खूप काही शिकलो आहोत.” असे म्हणत त्याने संघातील इतर सहकाऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे ट्वीट सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने ५० षटकांत ८ गडी गमावून २९१ धावा केल्या. अशाप्रकारे अफगाणिस्तान संघाला विजयासाठी २९२ धावांचे लक्ष्य होते. पण सुपर-४ फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तान संघाला ३७.१ षटकांत किंवा त्याआधी लक्ष्य गाठायचे होते. अफगाणिस्तानसाठी मोहम्मद नबीने ३२ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याचवेळी अफगाणचा कर्णधार हशमुतल्लाह शाहिदीने ६६ चेंडूत ५९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि १ षटकार लगावला. श्रीलंकेकडून कसून राजिताने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर ड्युनिथ वेलेगेले आणि धनंजय डी सिल्वा यांना २-२ असे यश मिळाले. महिष तिक्षणा आणि महिथा पाथिराना यांनी १-१ विकेट आपल्या नावावर केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 fans encourage rashid khan who is devastated by afghanistans defeat against sri lanka avw
Show comments