Venkatesh Prasad on Javed Miandad: आशिया चषक २०२३च्या यजमानपदावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळायला जाऊ शकत नाही, त्यामुळे आशिया चषक तटस्थ देशात हलवावा लागेल. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वादग्रस्त विधाने करत आहेत. माजी कर्णधार जावेद मियाँदादने आशिया चषकाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधान केले आहे.
आशिया चषक २०२३च्या यजमानपदावरून भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने रविवारी आक्षेपार्ह टिप्पणी केली. पाकिस्तानमध्ये आशिया चषक आयोजनाला विरोध करणाऱ्या बीसीसीआयच्या भूमिकेवर त्यांनी ‘भाड मे जायें वो’ असे शब्द वापरले. आता मियाँदादच्या या कमेंटवर भारताचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादने ट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे.
‘भारत नहीं आता तो भाड़ में जाएं’- जावेद मियाँदाद
मियाँदाद म्हणाला की, “भारत पाकिस्तानच्या पराभवाच्या भीतीने पाकिस्तानात येत नाही. तो एका यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हणाला, “मी आधीही म्हणायचे, जर तू आला नाहीस तर नरकात जा, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आमचे क्रिकेट मिळवत आहोत. हे आयसीसीचे काम आहे, जर आयसीसी या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नसेल, तर प्रशासकीय मंडळाला काही काम नाही. आयसीसीने प्रत्येक देशासाठी एक नियम असावा. जर असे संघ आले नाहीत, मग ते कितीही मजबूत असले तरी तुम्ही त्यांना काढून टाकावे. आशिया चषकातून देखील वगळावे.”
व्यंकटेश प्रसाद यांचे मियाँदादला चोख प्रत्युत्तर
मियाँदादच्या या वक्तव्यावर भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. प्रसाद यांनी ट्विट केले, “पण ते नरकात जाण्यास नकार देत आहेत.” आपण नरकात म्हणजेच पाकिस्तानात जाण्यास नकार देत आहोत, असे बहुधा प्रसाद म्हणू पाहत आहेत. या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषक २०२३ चे आयोजन करण्याचा अधिकार पाकिस्तानला मिळाला आहे, परंतु बीसीसीआय या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही यावर ठाम आहे. या संदर्भात, आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) एक तातडीची बैठक शनिवार, ०४ फेब्रुवारी रोजी बहारीनमध्ये बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझम सेठी उपस्थित होते.
बैठकीत बीसीसीआयने आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसून ही स्पर्धा इतरत्र आयोजित केली जाईल, असा आग्रह धरला. आशिया चषक २०२३ आता कुठे आयोजित केला जाईल, पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल. २००८ पासून भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही आणि जवळपास १५ वर्षांनंतर टीम इंडिया यावेळी पाकिस्तानचा दौरा करेल अशी शक्यता होती, पण आता तसे होताना दिसत नाही. बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर, पाकिस्तानने देखील सांगितले आहे की ते देखील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी भारतात जाणार नाहीत.