Indian cricket team conditioning camp: आशिया चषक २०२३च्या आधी, भारतीय क्रिकेटपटूंनी गुरुवारी कठीण फिटनेस ‘कवायती’ केल्या, ज्यामध्ये ‘यो-यो’ टेस्टचा देखील समावेश होता. एनसीएच्या या सरावात उपस्थित सर्व खेळाडूंनी ‘यो-यो’ टेस्ट उत्तीर्ण केली. यात फार काही आश्चर्याची गोष्ट नसली तरी, विराट कोहलीने यात सर्वाधिक १७.२ गुण मिळवले. ही टेस्ट सहा दिवसीय खेळाडूंच्या फिटनेस आणि कौशल्य विकास शिबिराचा एक भाग आहे. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट बोर्ड) ने फिटनेस पॅरामीटर १६.५ ठेवले आहे.
रोहित-हार्दिकही यो-यो पास झाले
विराट कोहली व्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या देखील येथील KSCA-अलूर मैदानावर इतर खेळाडूंसह ‘कवायती’मध्ये सहभागी होता आणि या दोघांनी ‘यो-यो’ टेस्ट उत्तीर्ण पास केली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “सर्वजण चाचणीत यशस्वी झाले आहेत आणि लवकरच अहवाल बीसीसीआयला पाठवला जाईल. त्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेला रवाना होईल.”
‘या’ खेळाडूंची यो-यो टेस्ट होणार नाही
चार खेळाडू (जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा) शुक्रवारी शिबिरात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. हे चौघेही आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळल्यानंतर डब्लिनहून थेट बंगळुरूला पोहोचतील. गुरुवारी ‘यो-यो’ टेस्ट वगळता, इतर फिटनेस संबधित गोष्टी बहुतेक घरामध्ये आयोजित केल्या गेल्या होत्या, परंतु शुक्रवारपासून मैदानी कवायती वाढवल्या जातील. आयर्लंडमधून परतलेल्या खेळाडूंची ‘यो-यो’ चाचणी घेतली जाणार नाही परंतु शिबिराच्या कौशल्य-सन्मान भागामध्ये त्यांचा समावेश केला जाईल.
हेही वाचा: IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याबाबत सौरव गांगुलीची भविष्यवाणी; म्हणाला, “जो संघ दबाव…”
के.एल. राहुलवर विशेष लक्ष
मैदानावरील त्याच्या कामगिरीवर सर्वांचेच विशेष लक्ष असणार आहे त्यात ‘मॅच सिम्युलेशन’ सत्रांचा समावेश असेल. त्याचे पर्यवेक्षण फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड करतील. के.एल. राहुलच्या तंदुरुस्तीवर संघ व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. राहुल फिटनेस ड्रिलमध्येही सामील होता पण त्याला यो-यो टेस्ट करायला नाही सांगितली. राहुलचा भारताच्या आशिया चषक संघात समावेश करण्यात आला आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले की, “यष्टीरक्षक फलंदाजाला किरकोळ दुखापत झाली आहे जी त्याच्या पूर्वीच्या दुखापतीशी संबंधित नव्हती. त्यामुळे तो लवकरच मैदानावर खेळताना दिसेल.”
श्रेयस अय्यरच्या कामगिरीवरही लक्ष
संजू सॅमसनचा आशिया चषक संघात ‘राखीव’ खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला. तो लोकेश राहुलचा बॅकअप खेळाडू संघात आला आहे. संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (NCA) फिजिओ राहुलच्या फलंदाजीच्या तंदुरुस्तीबद्दल समाधानी आहेत परंतु, यष्टीरक्षणाच्या जबाबदारीसाठी खेळाडूच्या तयारीबद्दल अधिक स्पष्टता येणे अजून आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत या पैलूवर लक्ष ठेवले जाईल. सध्यातरी राहुल आशिया चषकाच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर असू शकतो. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला एनसीए अधिकार्यांनी तो सर्व सामने खेळू शकतो असा हिरवा कंदील दिला आहे. मात्र, मुंबईचा खेळाडू दुखापतीतून पुनरागमन करत असल्याने त्याच्यावरही बारकाईने लक्ष ठेवले जाईल.