BCCI get support over Asia Cup: आशिया चषक २०२३च्या आयोजनाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद सुरू आहे. पीसीबीला ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याची इच्छा आहे तर बीसीसीआयला आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित करण्यात यावा कारण, भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला जाणार नाही. या वादात अशी बातमी समोर आली आहे की, आता बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या बोर्डांने बीसीसीआयला पाठिंबा दिला आहे. आशिया चषक २०२३ पाकिस्तानात आयोजित करू नये, असे या दोन्ही मंडळांचे म्हणणे आहे.
आशिया चषक २०२३ बाबत अद्याप पेच अडकला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी पाकिस्तानकडे आली असली, तरी सध्या जे काही सुरू आहे, ते पाहता आशिया चषक पाकिस्तानात होईल, असे वाटत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडिया पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे, तेव्हापासून हे प्रकरण अडकले आहे आणि आता पाकिस्तान म्हणावे की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीला आणखी एक धक्का बसला आहे. आतापर्यंत फक्त भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता, मात्र आता आणखी दोन देश त्यात सामील झाले आहेत. अशा स्थितीत आशिया चषक पाकिस्तानच्या हातून बाहेर होण्याची शक्यता वर्तवली जात असून आणखी काही करण्याच्या रणनीतीवरही विचार केला जात आहे.
बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डही बीसीसीआयसोबत आले होते
आशिया चषक २०२३ सप्टेंबरमध्ये होणार असून याचे आयोजन पाकिस्तानने केले आहे, परंतु BCCIचे सचिव आणि ACC म्हणजेच आशिया क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाऊ शकत नाही हे फार पूर्वीच स्पष्ट केले आहे. यामागे भारत आणि पाकिस्तानमधील परस्पर संबंध आणि टीम इंडियाची सुरक्षा हे एक मोठे कारण आहे. दरम्यान, आता श्रीलंका आणि बांगलादेशच्या क्रिकेट बोर्डानेही बीसीसीआयची बाजू घेतल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, श्रीलंका आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही यंदाचा आशिया चषक पाकिस्तानमधून बाहेर नेण्यास पाठिंबा दिला आहे. आपल्या अहवालात सूत्रांचा हवाला देत असा दावा करण्यात आला आहे की, श्रीलंका आणि बांगलादेश देखील आशिया चषक पाकिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी उत्सुक आहेत. आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानच्या बाहेर तटस्थ ठिकाणी व्हावे, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. अशा परिस्थितीत, आशिया चषक पुन्हा यूएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केला जाण्याची शक्यता आहे, जिथे २०२२ साली आशिया चषक झाला होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे हायब्रीड मॉडेल काय आहे?
खरे तर अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी हायब्रीड मॉडेल सुचवले होते. या हायब्रीड मॉडेलनुसार आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाणार आहे. भारतीय संघ आपले सामने संयुक्त अरब अमिराती किंवा इतर कोणत्याही देशात खेळू शकतो… तथापि, बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हायब्रीड मॉडेलची सूचना पूर्णपणे नाकारली. त्याचवेळी आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का दिला आहे.
हेही वाचा: ICC ODI Ranking: भारताने पाकिस्तानला दिला धोबीपछाड, केवळ ४८ तासात झाला मोठा फेरबदल
वन डे विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानही सहभागी होणार का?
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक देखील याच वर्षी होणार आहे, ज्याचे आयोजन भारत करत आहे. बीसीसीआय आपले संपूर्ण वेळापत्रक निश्चित करण्यात व्यस्त आहे. दरम्यान, अशीही बातमी येत आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयने लेखी आश्वासन द्यावे की, त्यानंतर २०२५ साली चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होईल, ज्यामध्ये टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळायला येईल. मात्र बीसीसीआयकडून याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. एसीसीच्या पुढील बैठकीत बीसीसीआयकडून आशिया चषक पाकिस्तानव्यतिरिक्त अन्य देशात आयोजित करण्याबाबत कठोर भूमिका घेतली जाईल, असे मानले जात आहे. असे वृत्त आहे की बीसीसीआय पीसीबीचा प्रस्ताव देखील नाकारू शकते, ज्यामध्ये पीसीबीने असे म्हटले आहे की आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने अन्य कोणत्या तरी देशात व्हावेत आणि उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये व्हावेत.