Najam Sethi on Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी गुरुवारी (५ जानेवारी) २०२३-२४ हंगामासाठी एसीसी कॅलेंडर जारी केले. त्यानुसार आशिया चषक २०२३ या वर्षी सप्टेंबर महिन्यात खेळवला जाणार आहे. मात्र, ही स्पर्धा कुठे खेळवली जाईल, याचा उल्लेख जय शहा यांनी केला नाही. तसेच या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जय शहाने जाहीर केलेले नाही.
आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख नजम सेठी यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष जय शाह यांचा समाचार घेतला आहे. नजम सेठी यांनी ट्विट केले की, ”एसीसी संरचना आणि कॅलेंडर २०२३-२४ एकतर्फी सादर केल्याबद्दल जय शाहांना धन्यवाद. विशेषतः आशिया चषक २०२३ साठी जो पाकिस्तानने आयोजित केला आहे. जेव्हा तुम्ही याच्याशी जोडले असाल, तेव्हा तुम्ही आमच्या पीएसएल २०२३ ची रचना आणि वेळापत्रक देखील सादर करू शकता.”
या संपूर्ण प्रकरणाबाबत नजम सेठी यांनी इंडिया टुडे ग्रुपशीही संवाद साधला. जय शाह यांनी सल्लामसलत न करता आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केल्याचा आरोप नजम सेठी यांनी केला आहे. ते म्हणाला, ”मी फैसल हसनैन (पीसीबी सीईओ) यांना याबद्दल विचारले, त्यांनी सांगितले की आमच्याशी सल्लामसलत केली गेली नाही. मला कोणताही ईमेल आला नाही आणि पाकिस्तान विकास समितीचा सदस्य नसला तरी आमच्याशी सल्लामसलत करण्यात गैर काय आहे.
हेही वाचा – IND vs SL 2nd T20: हार्दिक पांड्याने ‘या’ दोन गोष्टींवर फोडले पराभवाचे खापर: म्हणाला, ‘नो बॉल टाकणे म्हणजे…’
सेठी पुढे म्हणाले की, ”पाकिस्तानला आशिया चषक तटस्थ देशात नव्हे तर स्वतःच्या देशात आयोजित करायचा आहे. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा सहभाग त्यावेळच्या त्यांच्या सरकारवर अवलंबून असेल.”
आशिया चषक २०२३ चे आयोजन मुळात पाकिस्तानमध्ये केले जाणार आहे, परंतु खराब संबंधांमुळे बीसीसीआय आपला संघ तेथे पाठवण्यास तयार नाही. जय शाह यांनी गेल्या वर्षी भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर पीसीबीचे तत्कालीन प्रमुख रमीझ राजा यांनी वनडे वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. राजा यांनी असा युक्तिवाद केला की पाकिस्तानला यजमानपदाचा अधिकार देण्याचा निर्णय एसीसीच्या संचालक मंडळाने घेतला होता. त्यामुळे शाह टूर्नामेंट हलवण्याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत.
पुढील दोन वर्षांच्या क्रिकेट कॅलेंडरचे प्रकाशन करताना जय शाह म्हणाले, ”हा कार्यक्रम आमच्या या खेळाला नवीन उंचीवर नेण्यासाठी आमचे अनोखे प्रयत्न आणि उत्कटता दर्शवते. क्रिकेटसाठी हा काळ चांगला आहे. एसीसीने घोषित केलेल्या दोन वर्षांच्या चक्रात (२०२३-२०२४ दरम्यान) एकूण १४५ एकदिवसीय आणि टी२० सामने खेळले जातील. २०२३ मध्ये ७५ आणि २०२४ मध्ये ७० सामने होतील.
याशिवाय उदयोन्मुख (२३ वर्षांखालील) आशिया कप देखील कॅलेंडरमध्ये पुनरागमन झाले आहे. या वर्षी जुलैमध्ये पुरुषांच्या आठ संघांची स्पर्धा ५० षटकांच्या स्वरूपात खेळवली जाईल. पुढील वर्षी डिसेंबरमध्ये ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये होणार आहे. या वर्षी जूनमध्ये होणारी महिला उदयोन्मुख आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये असेल, ज्यामध्ये आठ संघांचा सहभाग असेल.