Rohit Sharma on Kuldeep Yadav: आशिया कपमध्ये अत्यंत चुरशीच्या सामन्यात श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवचे कौतुक केले आहे. “हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांच्या अप्रतिम गोलंदाजीमुळेच टीम इंडिया हा सामना जिंकू शकला,” असे रोहित शर्माचे मत आहे. याबरोबरच रोहित शर्माने हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवचा खडतर प्रवासही सांगितला. “दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणे एवढी सोपी गोष्ट नसते,” असेही तो म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याच्या आशिया कपमध्ये टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळला पराभूत केल्यानंतर, संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि तिथले दोन्ही सामने (पाकिस्तान आणि श्रीलंका) जिंकले. पाकिस्तानचा २२८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केल्यानंतर भारताने दुसऱ्या सुपर-४ सामन्यात श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. जर दोन्ही सामन्यांबद्दल बोलायचे तर, कुलदीप यादव टीम इंडियासाठी स्टार परफॉर्मर म्हणून उदयास आला. २८ वर्षीय या खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध ९.३ षटकांत ४३ धावांत चार विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: Asia Cup 2023: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! नसीम शाह आशिया कपमधून बाहेर, हारिस रौफबाबत सस्पेन्स कायम

कर्णधार रोहितने कुलदीप यादवचे कौतुक केले

रोहित शर्माने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कुलदीप यादव बाबत म्हटले की, “कुलदीप गेल्या एक वर्षापासून चांगली गोलंदाजी करत आहे. त्याने आपल्या तालावर मेहनत घेतली आहे. त्याने आपल्या बॉलिंग स्पीड आणि अ‍ॅक्शनवर खूप मेहनत घेतली आहे. शेवटच्या १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीचे परिणाम तुम्ही पाहू शकता. त्याने आम्हाला अनेक पर्याय दिले आहेत. त्यामुळे पुढे जाण्याची ही चांगली चिन्हे आहेत. जोपर्यंत मी कर्णधार आहे तोपर्यंत कुलदीप यादव संघातून बाहेर जाणार नाही.” असे त्याने सूचक विधान केले.

भारताच्या या दोन्ही विजयांमध्ये कुलदीपने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याची शानदार गोलंदाजी पाहून भारतीय कर्णधार रोहित शर्माने कुलदीपचे भरभरून कौतुक केले. रोहित म्हणाला की, “कुलदीप गेल्या एक वर्षापासून शानदार गोलंदाजी करत आहे आणि त्याने पुन्हा संघात पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.”

कुलदीप यादवबद्दल बोलताना रोहित शर्मा पुढे म्हणाला, “या खेळपट्टीवर हे लक्ष्याचा बचाव करणे एवढे सोपे नव्हते. कुलदीपने अप्रतिम गोलंदाजी करून ते सध्या केले. कुलदीप सातत्याने चांगली गोलंदाजी करत असून त्याने त्याच्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतली. कुलदीपचे पुनरागमन आमच्यासाठी दिलासादायक आहे. गेल्या १० सामन्यांमध्ये कुलदीप गोलंदाजीत काय चमत्कार करतो हे आपण पाहिले आहे.” टीम इंडियाचा कर्णधार पुढे म्हणाला, “श्रीलंकेविरुद्धचा सामना अटीतटीचा होता. कठीण खेळपट्टीवर असा खडतर सामना खेळून आम्हाला दबावाच्या परिस्थितीचा सामना करण्याची संधी मिळाली. ही स्पर्धा अनेक अर्थांनी आव्हानात्मक होती. भविष्यातही अशा खेळपट्ट्यांवर खेळण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

हेही वाचा: Afghanistan Team WC 2023: नवीन विरुद्ध विराट २.०! कोहलीशी पंगा घेणाऱ्या अफगाणी खेळाडूचा विश्वचषक २०२३च्या संघात समावेश

रोहितने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर भाष्य केले

हार्दिक पांड्याचे कौतुक करताना कर्णधार रोहित म्हणाला, “हार्दिक पांड्याने गेल्या काही वर्षांत त्याच्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे. एका दिवसाच्या मेहनतीने तुम्ही असा परफॉर्मन्स देऊ शकत नाही. हार्दिक पांड्याची गोलंदाजी पाहणे ही खूप आनंददायी गोष्ट आहे. प्रत्येक चेंडूवर हार्दिक पांड्या विकेट घेणार असे वाटत होते.”

रोहित शर्माने ग्राउंड्समनचे कौतुक केले

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर मुलाखतीत ग्राउंड्समनचे कौतुक केले. किती अवघड काम आहे याची जाणीव असल्याचे त्याने सांगितले. रोहित शर्मा म्हणाला, “आम्हाला फक्त मैदानात खेळण्यासाठी उतरायचे होते, सरावासाठी थोडा वेळ हवा होता. अनेक खेळाडूंना हे जमले नाही. ग्राउंड्समनच्या अथक प्रयत्नांमुळेच हे घडू शकले. मला माहित आहे की संपूर्ण जमीन झाकणे आणि नंतर कव्हर काढणे किती कठीण आहे. संपूर्ण टीमच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. तुम्ही खरे हिरो आहात.” भारताचा पुढील सामना बांगलादेश विरुद्ध शुक्रवारी १५ तारखेला होणार असून आशिया चषकाची फायनल ही १७ तारखेला खेळवली जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 rohit sharma admires hardik pandya and kuldeep yadav said these two players special for team india avw
Show comments