आशिया चषक-२०२३च्या आयोजनावरून वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या मुद्द्यावरून भारताला अनेक वेळा पोकळ धमकी देणाऱ्या रमीझ राजाने पुन्हा एकदा आशिया चषक या ‘वादात’ उडी घेतली आहे. मात्र, त्यांचे लक्ष्य आता पीसीबीचे अध्यक्ष आहेत. “नजम सेठी यांची मानसिक स्थिती ठीक आहे की नाही हे शोधून काढले पाहिजे,” अशा कठोर शब्दात रमीझ राजा यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. खरे तर, सेठी यांनी अलीकडेच सांगितले होते की आशिया चषकासाठी इंग्लंडदेखील तटस्थ ठिकाण म्हणून एक स्थान असू शकते. यावरच रमीझ राजा यांनी आक्षेप घेतला आहे.
माजी पीसीबी प्रमुख रमीझ राजा म्हणाले, “इंग्लंडमध्ये आशिया चषक खेळवणे हे ऐकून तर भल्याभल्यांना झीट येईल, पीसीबी अध्यक्षांचे म्हणणे ऐकून मला खूप हसू तर आलेच पण त्यांची कीव करावीशी वाटते. नजम सेठी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे की काय असे वाटते. त्यांची मानसिक स्थिती काय आहे हे एकदा जाणून घेतले पाहिजे.” इतक्या कठोर शब्दात त्यांनी नजम सेठींवर टीका केली.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ म्हणाले की, “आशिया चषकाचा मुख्य उद्देश, विशेषत: जेव्हा तो विश्वचषकापूर्वी आयोजित केला जातो तेव्हा संघांना उपखंडातील परिस्थितीशी जुळवून घेण्याची संधी देणे हा आहे.” माजी पीसीबीप्रमुखांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, “मला राग आणणारे आणखी एक विधान म्हणजे अध्यक्षांनी पत्रकारांसमोर केलेली ही वायफळ बडबड हे आहे. त्यांना पाकिस्तानमधील करामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तान सुपर लीगचा नववा हंगाम आयोजित करायचा आहे.”
रमीझ राजा पुढे म्हणाले की, “आशिया चषकाची मूळ संकल्पनाच अशी होती की क्रिकेट फक्त युरोप, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात नाही तर तो इतर ठिकाणी खासकरून आशिया खंडातदेखील खेळला जातो. पूर्वी वर्ल्ड कपचे आयोजन हे फक्त इंग्लंडमध्ये होत असे. म्हणूनच या धर्तीवर आशियाई क्रिकेट कौन्सिलची स्थापना झाली. हे महाशय मात्र त्याच देशात आशिया चषक आयोजित करू इच्छितात त्यांनी थोडा इतिहास वाचावा.” असा सल्ला रमीझ राजांनी नजम सेठींना दिला आहे.
रमीझ राजा पुढे म्हणाले, “एकीकडे तुम्ही (नजम सेठी) आशिया चषकाबाबत पाकिस्तान क्रिकेटसाठी सुरक्षित असल्याचे सांगत आहात, पण दुसरीकडे पीएसएल पाकिस्तानमध्ये होऊ नये असे तुम्ही म्हणता. याचा अर्थ काय?” राजा पुढे बोलताना म्हणाले, “पीएसएल पाकिस्तानमध्ये परत आणण्यासाठी आणि जगाला दाखवून देण्यासाठी आम्हाला बरीच वर्षे लागली की पाकिस्तान अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन करण्यास सक्षम आहे, परंतु तुम्हाला ते संपवायचे आहे. हेच पाकिस्तानचे मोठे दुर्दैव आहे.”