Ravi Shastri on IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना शनिवारी म्हणजेच आज श्रीलंकेतील पल्लेकेले येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचे सर्व दिग्गज खेळाडू आपले मत मांडत आहेत. या यादीत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दोन्ही संघांबद्दल सांगितले आहे. माहितीसाठी की, हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार असून दोन्ही संघ मजबूत आहेत, असा विश्वास मुख्य प्रशिक्षकांनी व्यक्त केला. सामन्याआधी त्यांनी श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह संदर्भात सूचक विधान केले आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना शास्त्री म्हणाले की, “भारत आशिया कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. २०११ एकदिवसीय विश्वचषकनंतर हा भारताचा सर्वात मजबूत संघ असून टीम इंडियाची फलंदाजी चांगली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला खूप अनुभव आहे आणि तो खेळ चांगल्या प्रकारे समजतो.” माजी मुख्य प्रशिक्षकाचा असा विश्वास आहे की, रोहित अनुभवी असण्याबरोबरच एक समंजस कर्णधार देखील आहे. त्यांच्या मते, भारत हा पाकिस्तानपेक्षा मजबूत संघ आहे, पण मेन इन ग्रीन देखील आता मजबूत संघ आहे. शास्त्री म्हणतात की, ७ ते ८ वर्षांपूर्वी दोन्ही संघांच्या फलंदाजीत खूप फरक होता, पण आता पाकिस्तानने तो कमी केला आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याबाबत पुढे बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “या दोन संघांमध्ये जेव्हाही सामना खेळला जातो तेव्हा अतिरिक्त दडपण असते, मात्र खेळाडूंनी हे दडपण स्वत:वर घेऊ नये, त्यांनी सामान्य सामन्याप्रमाणेच खेळले पाहिजे.” या माजी भारतीय फलंदाजाने सांगितले की, “खेळाडूचा फॉर्म विजयात महत्त्वाची भूमिका बजावेल, परंतु त्याचा स्वभाव गेम चेंजर देखील ठरू शकतो. सर्व खेळाडूंना फक्त शांत राहावे लागेल आणि मानसिकरित्या स्वतःवर जास्त दबाव टाकू नये. भारतीय संघ पाकिस्तानला पराभूत करू शकतो,” असे शास्त्री यांचे मत आहे.
प्लेईंग ११ बाबत के.एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह संदर्भात सूचक विधान केले. रवी शास्त्री म्हणाले, “ (दो साल से क्या झक मार रहे थे उनका फॉर्म भी तो अच्छा था. वो इनजिअर्ड हुये उसमे उनका क्या दोष.) दोन वर्षापासून काय झक मारत होते. याआधी पण चांगल्या फॉर्ममध्ये ते खेळत होते. जर ते दुखापतग्रस्त झाले तर त्याच्यात त्यांचा काय दोष. भारतीय संघ त्यांना खेळवण्यासाठी बघतो आहे ही चांगली बाब आहे. सध्या भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे.”
दोन्ही संघांचे प्लेइंग-११
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ.