Yuzvendra Chahal Not In Asia Cup 2023 Squad: बीसीसीआयने आशिया चषक २०२३ साठी आपला १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात मोठ्या ब्रेकनंतर जसप्रीत बुमराहचे आगमन झाले आहे तर के.एल. राहुल, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर यांची सुद्धा संघात वापसी झाली आहे. नव्या चेहऱ्याचा संघ म्हणून या टीम इंडियाकडे पाहिले जात असताना गोलंदाज युझवेंद्र चहल व शिखर धवनला वगळणे हे चाहत्यांना फारसे आवडलेले दिसत नाही. प्रसिध कृष्णाला पाचवा सीम बॉलिंग पर्याय म्हणून निवडण्यात आले मात्र चहलला संघात जागा दिलेली नाही यावरून ट्विटरसह सोशल मीडियावर निवड समितीला प्रश्न केले जात आहेत.
BCCI चे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयावर स्पष्टीकरण दिले आहे. निवड समितीला युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन तरबेज मनगटी फिरकीपटू (रिस्ट स्पिनर्स) पैकी निवडीचा कठीण निर्णय घ्यावा लागला. अखेरीस, अलीकडच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (ODI) केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कुलदीप यादवकडे निवड समितीचा कल झुकत होता. चहल निश्चितच एक उत्कृष्ट खेळाडू आहे, परंतु आम्हाला संघाच्या संतुलनाचा काळजीपूर्वक विचार करायचा होता. संघात दोन फिरकीपटूंना स्थान देणे शक्य नव्हते.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने सुद्धा आगरकर यांच्या मताला समर्थन दर्शवत फिरकी गोलंदाज आर अश्विन, युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर, यांना त्यांची योग्यता सिद्ध करण्यासाठी आणि आगामी विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी नक्कीच संधीची दारं उघडी आहेत, असे सांगितले.
हे ही वाचा<< आशिया चषकात रोहित शर्माशिवाय सलामीवीर म्हणून भारताकडे ‘हे’ दोन पर्याय; आगरकर म्हणाले, “काहींना संधी..”
दुसरीकडे शिखर धवनची निवड न होण्यावरून सुद्धा आगरकर यांनी उत्तर देत “केवळ १५ जणांना जागा देणे शक्य असते त्यामुळे साहजिकच काहींना संधी देणे शक्य होत नाही. ” असे म्हटले आहे. दरम्यान, आशिया चषकातील सामन्यांचे सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, शुबमन गिल आणि ईशान किशन या पर्यायांना प्राधान्य दिले जाईल असेही मुख्य निवडकर्त्यांनी सांगितले आहे.