वृत्तसंस्था, दुबई : सूर्यकुमार यादव (नाबाद ६८ धावा) आणि विराट कोहली (नाबाद ५९) यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने बुधवारी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात हाँगकाँगवर ४० धावांनी मात केली. सलग दुसऱ्या विजयासह भारताने ‘अव्वल चार’ फेरीत प्रवेश मिळवला आहे.
दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद १९२ अशी धावसंख्या उभारली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीच्या षटकांत काही चांगले फटके मारताना १३ चेंडूंत २१ धावा केल्यावर त्याला आयुष शुक्लाने बाद केले. तसेच केएल राहुलला या सामन्यातही सूर गवसला नाही. त्याने ३६ धावांची खेळी केली, पण त्यासाठी ३९ चेंडू घेतले.
सूर्यकुमार आणि विराट या जोडीने मात्र अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. मुंबईकर सूर्यकुमारने मैदानाच्या चारही कोपऱ्यांत फटके मारण्याचे कसब पुन्हा सिद्ध केले. त्याने २६ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. त्याला विराटची तोलामोलाची साथ लाभली. विराटने सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेतला. परंतु, अखेरच्या काही षटकांत त्याने धावांची गती वाढवली. अखेरीस त्याने ४४ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने नाबाद ५९ धावांची केली. सूर्यकुमार-विराट जोडीने सात षटकांतच ९८ धावांची भर घातली.
त्यानंतर १९३ धावांचा पाठलाग करणाऱ्या हाँगकाँगला २० षटकांत ५ बाद १५२ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून बाबर हयात (३५ चेंडूंत ४१), किंचित शहा (२८ चेंडूंत ३०) आणि झीशान अली (१७ चेंडूंत नाबाद २६) यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, मधल्या षटकांत त्यांना वेगाने धावा न करता आल्याने त्यांचा पराभव झाला.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत २ बाद १९२ (सूर्यकुमार यादव नाबाद ६८, विराट कोहली नाबाद ५९; मोहम्मद घझनफर १/१९) विजयी वि. हाँगकाँग : २० षटकांत ५ बाद १५२ (बाबर हयात ४१, किंचित शहा ३०; रवींद्र जडेजा १/१५, भुवनेश्वर कुमार १/१५)
हार्दिकला क्रमवारीत बढती
दुबई : भारताच्या हार्दिक पंडय़ाला ‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बढती मिळाली असून त्याने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. हार्दिकने आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध सलामीच्या सामन्यात तीन बळी मिळवतानाच नाबाद ३३ धावाही केल्या होत्या. या कामगिरीमुळे त्याने क्रमवारीत आगेकूच केली. दुसरीकडे, कसोटी क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाने अग्रस्थान कायम राखले असून त्याच्या खात्यावर ३८४ गुण आहेत. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (३६० गुण) दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
भारत-पाकिस्तानला दंड
दुबई : आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील लढतीत षटकांची गती धिमी राखल्यामुळे भारत आणि पाकिस्तान या संघांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्या सामन्याच्या मानधनातील ४० टक्के रक्कम दंडाच्या स्वरूपात आकारली जाणार आहे. गेल्या रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आशिया चषकाच्या अ-गटातील लढतीत आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघ आणि पाकिस्तान संघाने निर्धारित वेळेत प्रत्येकी दोन षटके कमी टाकल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. सामनाधिकारी जेफ क्रो यांनी हा दंड ठोठावला आहे.