KL Rahul taking an amazing catch on the bowling of Jasprit Bumrah: आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संघाचा हा निर्णय पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर उलटला, जेव्हा केएल राहुलने विकेटकीपिंगमधून पहिल्या स्लिपमध्ये जात शानदार झेल घेतला आणि भारताला पहिली विकेट मिळवून दिली.
जसप्रीत बुमराहने भारतासाठी डावातील पहिले षटक टाकले. बुमराहने षटकाच्या तिसऱ्या चेंडूला सामोरे जाणाऱ्या डाव्या हाताच्या कुसल परेराला जबरदस्त आऊट स्विंग टाकला, जो त्याला अजिबात समजू शकला नाही आणि चेंडू बॅटची बाहेरील कडा घेऊन चेंडू वर पहिल्या स्लिपमध्य उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या दिशेने जाऊ लागला. पण यष्टिरक्षक केएल राहुलने लांब डायव्ह मारत अप्रतिम झेल घेतला. राहुलचा हा झेल खरोखरच पाहण्यासारखा होता. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिराजने पहिल्यांदाच वनडेत घेतल्या ६ विकेट्स –
श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने आश्चर्यकारक कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सिराजने पहिल्यांदाच पाच विकेट घेतल्या. अंतिम फेरीत सिराजने आतापर्यंत पाथुम निसांका, कुसल मेंडिस, सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा आणि दासुन शनाका यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. वृत्त लिहेपर्यंत सिराजने सात षटकांत एका मेडनसह २१ धावा देत ६ बळी घेतले आहेत.
हेही वाचा – Asia Cup Final 2023 IND vs SL: मोहम्मद सिराजचा मोठा धमाका! एकाच षटकांत ४ विकेट्स घेत केला ‘हा’ खास पराक्रम
श्रीलंकेचा संघ ५० धावांवर आटोपला-
श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांवर बाद झाला. ही श्रीलंकेची आतापर्यंत भारताविरुद्धची वनडेतील सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. याआधी, या वर्षी जानेवारीमध्ये भारताने श्रीलंकेला २२ षटकांत ७३ धावांत गुंडाळले होते. एवढेच नाही तर भारताविरुद्धच्या वनडेमधली ही कोणत्याही संघाची सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. यापूर्वी बांगलादेशने २०१४ मध्ये मीरपूरमध्ये भारताविरुद्ध ५८धावा केल्या होत्या. ५० धावा ही कोणत्याही वनडे फायनलमधील सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. यापूर्वी शारजाह येथे झालेल्या आशिया कप २००० मध्ये भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध ५४ धावांत आटोपला होता. आता श्रीलंकेने यापेक्षाही कमी धावसंख्या उभारली आहे. म्हणजेच श्रीलंकेने केलेली ५० धावांची धावसंख्याही आशिया चषकातील सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. आता भारतीय संघाला ट्रॉफी जिंकण्यासाठी ५० षटकांत ५१ धावांची गरज आहे.