आशिया चषक स्पर्धेत सुमार खेळामुळे भारताचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आल्यानंतर आता पाकिस्तान आणि श्रीलंका या आशियातल्या दोन बलाढय़ संघांमध्ये  जेतेपदासाठी मुकाबला रंगणार आहे.  स्पर्धेत आतापर्यंत अपराजित श्रीलंकेचा संघ आणि दुखापतींनी ग्रासलेला पण सामन्याला कोणत्याही क्षणी कलाटणी देण्याची क्षमता असलेला पाकिस्तान संघ यांच्यात शनिवारी होणारी अंतिम लढत चुरशीची होणार आहे.
कुमार संगकारा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याची कामगिरी आणखी बहरते. अनुभवी खेळाडू महेला जयवर्धनेला सूर गवसावा, अशी श्रीलंकेच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. कुशल परेरा आणि लहिरु थिरिमाने जोडीकडून खंबीर सलामीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत लसिथ मलिंगा श्रीलंकेचे हुकूमी अस्त्र आहे. त्याच्या जोडीला अजंथा मेंडिस, सचित्र सेनानायके आणि चतुरंग डिसिल्व्हा हे त्रिकूट पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्यासाठी सज्ज आहे. अष्टपैलू थिसारा परेराची भूमिका निर्णायक ठरू शकते.
सातत्याचा अभाव हा पाकिस्तानच्या खेळातील कच्चा दुवा आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीतून पुनरागमन करणे हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. उमर गुल, अहमद शेहझाद आणि शर्जील खान हे दुखापतग्रस्त आहेत. अंतिम लढतीसाठी ते तंदुरुस्त होतील, असा विश्वास पाकिस्तान संघव्यवस्थापनाला आहे. शाहिद आफ्रिदीला गवसलेला सूर ही श्रीलंकेसाठी चिंतेची बाब आहे. उमर अकमल, अहमद शेहझाद चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
संघ : श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, लहिरू थिरिमाने, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, अशान प्रियंजन, अँजेलो मॅथ्यूज, चतुरंग डिसिल्व्हा, थिसारा परेरा, सचित्र सेनानायके, अजंथा मेंडिस, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, दिनेश चंडिमल, धम्मिका प्रसाद.
पाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), अहमद शेहझाद, मोहम्मद हफीझ, सोहेब मकसूद, फवाद आलम, अब्दुर रेहमान, शाहिद आफ्रिदी, उमर अकमल, उमर गुल, मोहम्मद तल्हा, सईद अजमल, बिलावल भट्टी, जुनैद खान, अन्वर अली, शर्जील खान.
सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-३