बांगलादेशमध्ये खेळवण्यात येणाऱ्या आशिया चषक हॉकी स्पर्धेची सुरुवात भारतीय संघाने विजयाने केली आहे. सलामीच्या सामन्यात जपानवर ५-१ ने विजय मिळवत या स्पर्धेत आपण विजयासाठी प्रबळ दावेदार असल्याचं भारतीय संघाने दाखवून दिलं आहे. माजी प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर भारतीय हॉकी संघासाठी ही पहिलीच मोठी आंतराष्ट्रीय स्पर्धा आहे. त्यामुळे नवीन प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष होतं. अपेक्षेप्रमाणे संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवत भारताने सलामीच्या सामन्यात विजय मिळवला आहे.
आजच्या सामन्यात सर्वच स्तरात भारतीय संघाने चांगला खेळ केला. आघाडीच्या फळीतला ताळमेळ, बचावपटूंचा बॉलवर ताबा ठेवण्याचं कसब या सर्व बाबी आजच्या सामन्यात जुळून आल्या होत्या. सामन्याच्या तिसऱ्या मिनीटाला एस. व्ही. सुनीलने गोल झळकावत भारतीय संघाचं खातं उघडलं. मात्र एका मिनीटाच्या अंतराने लगेचच जपानच्या केनजी किटाझाटोने गोल झळकावत जपानला बरोबरी साधून दिली. जपानच्या खेळाडूंच्या आक्रमक खेळामुळे सुरुवातीला भारतीय संघ काहीसा भांबावलेला दिसला. जपानच्या खेळाडूंनीही भारताच्या पेनल्टी क्षेत्रात काही सुंदर चाली रचत भारतीय बचावफळीवर चांगला दबाव टाकला. मात्र त्याचं गोलमध्ये रुपांतर करणं त्यांना काही जमलं नाही.
मात्र जपानी खेळाडूंचा दबाव झुकारून भारताने सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. ललित उपाध्यायने २२ व्या मिनीटाला गोल झळकावत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर झोकात आलेल्या भारतीय संघाने सामन्यात मागे वळून पाहिलचं नाही. यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी रचलेल्या एकाही चालीच उत्तर जपानी खेळाडूंकडे नव्हतं. काही वेळाने रमणदीप सिंहने ३३ व्या मिनीटाला भारताकडून आणखी एक गोल झळकावत आपली आघाडी ३-१ अशी वाढवली. या सामन्यात भारताला पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याच्याही अनेक संधी मिळाल्या, मात्र त्यापैकी दोन संधींचं रुपांतर भारतीय खेळाडू गोलमध्ये करु शकले. ३५ आणि ४८ व्या मिनीटाला गोल झळकावत भारताचा युवा ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंहने जपानला सामन्यात बॅकफूटवर ढकललं.
या स्पर्धेत दोन गटात संघांची विभागणी करण्यात आलेली असून, भारताचा समावेश यजमान बांगलादेशसह पाकिस्तान आणि जपानच्या ‘अ’ गटात करण्यात आला आहे. तर ‘ब’ गटात मलेशिया, दक्षिण कोरिया, चीन आणि ओमान या संघाचा समावेश करण्यात आला आहे.