आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला आज पहिल्यांदाच कडवी टक्कर मिळाली. साखळी फेरीतील पहिले ३ सामने जिंकून गटात पहिला क्रमांक मिळवलेल्या भारताला आज कोरियाने चांगलचं झुंजवलं. सामन्यात पहिला गोल झळकावत कोरियाने आघाडीही घेतली होती, मात्र भारताला बरोबरी साधण्यात काही केल्या यश येत नव्हतं. अखेर शेवटच्या मिनीटात भारताच्या गुरजंत सिंहने सुरेख मैदानी गोल झळकावत भारताचा संभाव्य पराभव टाळला. सर्वोत्तम ४ संघांच्या फेरीत भारताचा उद्या मलेशियाविरुद्ध सामना होणार आहे.

भारत आणि कोरिया हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने हा सामना रंगतदार होणार असं अनेकांनी भाकित वर्तवलं होतं. याचप्रमाणे प्रत्यक्ष सामन्यात दोन्ही संघांनी बचावात्मक पवित्रा घेत खेळ केला. मध्यांतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं. दुसऱ्या सत्रात भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंहच्या चालींचा अभ्यास कोरियाच्या बचावफळीने करुन ठेवला होता. पहिल्याच पेनल्टी कॉर्नरवर रमणदीप सिंहला पास देऊन गोल करण्याची भारताची चाल कोरियन बचावपटूंनी हाणून पाडली. त्यामुळे हा सामना ०-० अशा बरोबरी सुटतो की काय असं चित्र निर्माण झालं होतं.

मात्र मध्यांतरानंतर कोरियाच्या संघाने आपला खेळ बदलला. जास्तीत जास्त वेळ बॉलचा ताबा आपल्याकडे ठेवत कोरियाने भारताच्या बचावफळीवर आक्रमण करायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे भारताच्या बचावफळीने या आक्रमणाचा दबाव घेत चुका करण्यास सुरुवात केली. गोलपोस्ट समोरचा भाग रिकामा सोडण्यासारखी अक्षम्य चुक भारताच्या बचावफळीने तिसऱ्या सत्रात केली. अखेर ४१ व्या मिनीटाला कोरियाच्या जंगजुन लीने भारताची बचावफळी भेदत गोलकिपर सुरज करकेराला चकवत सामन्यातला पहिला गोल झळकावला. कोरियाकडून झालेल्या या गोलमुळे भारतीय संघ पुरता बॅकफूटला ढकलला गेला.

प्रतिस्पर्धी संघाने सामन्यात पहिला गोल झळकावल्यानंतर भारतीय संघ दबावाखाली येतो, हे आतापर्यंत अनेकदा झालेलं आहे. या सामन्यातही कोरियाने पहिला गोल झळकावल्यानंतर भारताचं सामन्यावरचं नियंत्रण सुटत गेलं. आघाडीच्या फळीमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय दिसून आला नाही. कोरियाचा बचाव भेदण्याचा साधा प्रयत्नही भारतीय खेळाडूंकडून झालेला दिसला नाही. त्यामुळे सामना संपायला अवघं एक मिनीटं शिल्लक असेपर्यंत भारताची गोलची पाटी कोरीच राहिली होती, त्यामुळे कोरियाचा संघ सामना जिंकणार असं वाटत असताना गुरजंत सिंहने संधीचा फायदा घेत बॉल गोलपोस्टमध्ये ढकलत भारताला सामन्यात बरोबरी साधून दिली. या गोलनंतर भारताचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनाही अक्षरशः हायस वाटलं.

या स्पर्धेत भारताचं आव्हान अद्यापही कायम आहे. उद्या भारताचा सामना मलेशियाच्या संघाविरुद्ध होणार आहे. मलेशियाने आज सर्वोत्तम ४ गटात पाकिस्तानवर मात केली. त्यामुळे उद्याच्या सामन्यात भारताला विशेष सतर्कता बाळगावी लागणार आहे. स्पर्धेत भारताचा संघ मलेशियापेक्षा सरस असला तरीही याआधी सुलतान अझलन शहा कप हॉकी आणि वर्ल्ड हॉकीलीग सेमीफायन स्पर्धेत मलेशियाने भारताला पराभवाचा धक्का दिला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात भारताला विजय मिळणं गरजेचं बनलं आहे.

Story img Loader