सुलतान अझलन शहा चषक हॉकी आणि वर्ल्ड हॉकीलीग सेमीफायनल स्पर्धेत झालेल्या पराभवाचा बदला आज भारतीय संघाने घेतला. बांगलादेशात सुरु असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने मलेशियावर ६-२ ने मात करत आपलं आव्हान कायम राखलं आहे. सर्वोत्तम ४ च्या गटात भारताचा हा पहिलाच विजय ठरला. कालच्या सामन्यात भारताला कोरियाविरुद्ध १-१ अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं. शनीवारी या गटात भारताची लढत पुन्हा एकदा आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
कोरियाविरुद्ध झालेल्या लढतीच्या तुलनेत आजच्या सामन्यात भारतीय संघामध्ये चांगला ताळमेळ दिसून येत होता. आघाडीच्या फळीत आकाशदीप सिंह, एस.व्ही.सुनील यांनी काही चांगल्या चाली रचत मलेशियावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यात यश आलं नाही. अखेर सामन्यात १५ व्या मिनीटाला आकाशदीप सिंहने भारताचं खातं उघडलं. पाठोपाठ १९ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीतने गोल झळकावत भारतासाठी दुसरा गोल केला. आकाशदीपच्या जोरदार फटका थांबवणं मलेशियाच्या गोलकिपरला जमलं नाही. भारताकडून लागोपाठ झालेल्या दोन हल्ल्यांमुळे मलेशियाचा संघ बॅकफूटला ढकलला गेला. यानंतर २४ व्या मिनीटाला ललित उपाध्याय, आकाशदीप सिंह आणि एस.के.उथप्पा यांनी रचलेल्या सुरेख चालीत मलेशियाचे खेळाडू पुरते फसले आणि उथप्पाने भारतासाठी तिसरा गोल करत मलेशियाला आणखी एक धक्का दिला. सामन्याच्या सुरुवातीच्या क्षणांमध्ये मिळालेली ही आघाडी भारताने मध्यांतरापर्यंत ३-० अशी यशस्वीपणे टिकवली.
मध्यांतरानंतर मलेशियाचा संघ भारताला टक्कर देईल अशी आशा होती. याआधी झालेल्या दोन सामन्यांमध्ये मलेशियाने भारताला पराभवाचं पाणी पाजलं आहे. मात्र प्रत्यक्ष सामन्यात भारतीय खेळाडूंनी मलेशियाला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. ३३ व्या मिनीटाला आकाशदिप सिंहच्या पासवर गुरजंत सिंहने बॉल गोलपोस्टमध्ये ढकलत भारताची आघाडी ४-० ने वाढवली. यादरम्यान भारताच्या खेळाडूंनी मलेशियालाच्या खेळाडूंना सामन्यात पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही. पाठोपाठ ४० व्या मिनीटाला गुरजंत सिंहने मलेशियाच्या बचावपटूंना चकवत पेनल्टी एरियात प्रवेश केला. यानंतर गुरजंतने दिलेल्या पासवर एस.व्ही.सुनिलने बॉल गोलपोस्टमध्ये ढकलण्याची औपचारिकता पूर्ण करत भारताचा पाचवा गोल झळकावला. यानंतर तिसऱ्या सत्रात मलेशियाला पेनस्टी कॉर्नवर गोल करण्याच्या संधी आल्या, मात्र त्याचा फायदा उचलणं मलेशियाला जमलं नाही. अखेर ५० व्या मिनीटाला मलेशियाच्या राझी रहीमने गोल करत भारताची आघाडी एका गोलने कमी केली.
यानंतर चौथ्या सत्रामध्ये मलेशियाला आपली पिछाडी कमी करण्याच्या अनेक संधी चालून आल्या होत्या. मात्र पेनल्टी कॉर्नवर गोलकीपर आकाश चिकटेने मलेशियाच्या खेळाडूंचे प्रयत्न हाणून पाडले. यादरम्यान सामना हातातून निसटून जात असलेला पाहून मलेशिया आणि भारतीय खेळाडूंमध्ये काहीवेळ बाचाबाची झालेली पहायला मिळाली. मात्र पंचांनी वेळेतच हस्तक्षेप करत हा प्रकार थांबवला. यानंतर चौथ्या सत्रात ५९ व्या मिनीटाला मलेशियाच्या रमदान रोसलीने पेनल्टी कॉर्नवर गोल करत भारताची आघाडी ५-२ ने कमी केली. पण सामना संपायला शेवटची २४ सेकंद बाकी असताना आकाशदीप सिंहच्या पासवर अनुभवी खेळाडू सरदार सिंहने भारतासाठी सहावा गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.