रुपिंदरपाल सिंगचे चार गोल तसेच व्ही. आर. रघुनाथने झळकावलेल्या हॅट्ट्रिकसह भारताने आशिया चषक हॉकी स्पर्धेत बांगलादेशचा ९-१ असा धुव्वा उडवला. भारताने यापूर्वीच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
एकतर्फी झालेल्या या लढतीवर भारताने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. भारताने पूर्वार्धातच ५-१ अशी मजबूत आघाडी घेतली होती. पेनल्टीकॉर्नरचा पुरेपूर फायदा भारतीय हॉकीपटूंनी उठवला. रुपिंदरपालने चौथ्या, १९व्या, २७व्या व ६१व्या मिनिटाला गोल केले. त्यापैकी तीन गोल त्याने पेनल्टीवर केले. रघुनाथनेही पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत २९व्या, ५२व्या व ५९व्या मिनिटाला असे तीन गोल केले. रघुनाथने आतापर्यंत या स्पर्धेत सहा गोल लगावले आहेत. निक्किन थिमय्या (२५व्या मिनिटाला) व मलक सिंग (४७व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत भारताच्या विजयात हातभार लावला. बांगलादेशचा एकमेव गोल कर्णधार मामुनूर रहेमानने ३५व्या मिनिटाला केला.
भारताने साखळी फेरीतील तिन्ही विजयांसह गटात अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तीन सामन्यांनंतर भारताचे नऊ गुण झाले आहेत. गतविजेत्या दक्षिण कोरियाने सहा गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. उपांत्य फेरीत भारताला मलेशियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत कोरियाची गाठ पाकिस्तानशी पडणार आहे.

Story img Loader