Suryakumar Yadav on ODI: आशिया कप २०२३मध्ये सर्वांच्या नजरा ‘मिस्टर ३६० डिग्री प्लेअर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टार फलंदाज सूर्यकुमार यादववर असतील. ज्याने दीर्घकाळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये संधी मिळूनही त्याचा फायदा उठवलेला नाही. त्याला संघाने पूर्ण संधी मात्र, अजिबात म्हणावी तशी कामगिरी त्याला करता आलेली नाही. सूर्याला याबद्दल विचारले असता त्याने सडेतोड उत्तर दिले आहे. त्याने सांगितले आहे की, “आशिया कप २०२३मध्ये चांगली कामगिरी करायची आहे, ज्यासाठी तो रोहित शर्मा, विराट कोहली आणि राहुल द्रविडशी सतत बोलत असतो.”
स्टार स्पोर्ट्सवरील संवादादरम्यान सूर्यकुमार यादव म्हणाला, “मला कोणतीही भूमिका दिली जाईल, मी ती माझ्या परीने १०० टक्के निभावण्याचा प्रयत्न करेन. जर माझ्या भूमिकेत बदल झाला तर मी त्यातही लवचिकता दाखवण्यास तयार आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की याच फॉरमॅटमध्ये मला चांगली फलंदाजी करायची आहे. टी२०मध्ये सर्वांना दाखवून दिले असून त्याचीच पुनरावृत्ती मला वन डे मध्ये करायची आहे.”
‘द-स्काय’ अशी ओळख मिरवणारा सूर्यकुमार पुढे म्हणाला, “व्हाईट बॉल क्रिकेट म्हणजेच टी२० आणि वन डे फॉरमॅटमध्ये समतोल राखणे खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच मी कठोर सराव करत आहे. याबरोबरच मी माझ्या अडचणींबाबत कोच राहुल द्रविड सर, रोहित भाई आणि विराट भाई यांच्याशीही बोलत आहे. आशा आहे की स्पर्धा जसजशी पुढे जाईल तसतसे मी ते खराब कामगिरीची मालिका खंडित करू शकेन आणि अधिक चांगली खेळी करेन.”
सूर्या म्हणाला, “प्रत्येकजण म्हणत आहे की मी टी२० मध्ये चांगली फलंदाजी करतो. दोन्ही बाजूने नवीन चेंडूने खेळतो. तसेच, या ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये असते. मात्र, एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी का करत नाही. यावर त्यांना उत्तर दिले की, मी यावर कसून सराव करत आहे आणि माझ्या मते हा सर्वात आव्हानात्मक फॉरमॅट आहे. सूर्यकुमार यादवच्या दृष्टीने वन डे क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटचा मेळ आहे. या फॉरमॅटमध्ये योग्य तो समतोल राखणे महत्त्वाचे असल्याचे तो म्हणाला.”
सूर्यकुमार यादवची वन डेमधील आकडेवारी
भारतीय क्रिकेट संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमधील सूर्यकुमार यादवची आकडेवारी जर पाहिली तर फारसा प्रभाव पडू शकलेला नाही. सूर्याने आतापर्यंत भारतासाठी २६ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५११ धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. आता सूर्याकडून आशिया चषकात चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका असेल आणि तो योग्य प्रकारे निभावेल, अशी त्याच्या चाहत्यांना खात्री आहे.