भारताचा आघाडीचा फलंदाज के. एल. राहुलने तब्बल १३१ दिवसांनी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. दुखापतीमुळे तो चार महिने संघापासून दूर होता. दुखापतीतून सावरल्यानंतर राहुलने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर तो फिटनेस टेस्टही पास झाला. लगोलग त्याची भारतीय संघात निवड झाली. परंतु, राहुलची संघातली निवड अनेकांना रुचली नाही. तसेच आशिया चषक स्पर्धेत सुपर ४ मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने राहुलला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. या निर्णयांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समितीवर टीकाही झाली. परंतु, त्यावर केएल राहुलने किंवा भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनातील कोणत्याही व्यक्तीने प्रतिक्रिया दिली नाही. राहुलने या सगळ्यांना त्याच्या फलंदाजीने उत्तर दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना के. एल. राहुल धावून आला. राहुलने विराट कोहलीबरोबर द्विशतकी भागीदारी करत शानदार शतक ठोकलं. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन हजार धावांचा टप्पा पार केला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली होती. कर्णधार रोहित शर्मा (५६) आणि शुबमन गिलने (५८) शतकी भागीदारी केली होती. परंतु १७ व्या षटकात रोहित आणि १८ व्या षटकात गिल बाद झाले. झटपट दोन बळी गेल्याने भारत अडचणीत आला होता. परंतु राहुल आणि विराटने भारताचा डाव सावरला.

विराट आणि राहुल या दोघांनी वैयक्तिक शतकं ठोकत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद २३३ धावांची भागीदारी केली. राहुलने या सामन्यात १०६ चेंडूत १२ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १११ धावा फटकावल्या. तर विराट कोहलीने ९४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १२२ धावा चोपल्या.

हे ही वाचा >> केएल राहुलचा उत्तुंग षटकार पाहून कप्तान रोहितने लावला डोक्याला हात, विराटकडूनही दाद, पाहा VIDEO

राहुल टीम इंडियाचा मधल्या फळीतला महत्त्वाचा फलंदाज आहे. परंतु, त्याच्या गैरहजेरीत श्रेयस अय्यर आणि इशान किशनने मधल्या फळीत चांगलाच जम बसवला होता. त्यामुळे मधल्या फळीत याच दोन फलंदाजांना संधी मिळावी अशी अनेकांची इच्छा होती. इशानने मधल्या फळीत खेळताना सलग चार सामन्यांमध्ये अर्धशतकं लगावली आहेत. त्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर इशानच्या नावासाठी अग्रही होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राहुलऐवजी इशानलाचं संधी मिळावी असं गंभीरने सामन्यापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं. परंतु या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने राहुलला संधी मिळाली. राहुलने या सामन्यात शतक ठोकून एक प्रकारे गौतम गंभीरला उत्तर दिलं आहे.