आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने असून क्रिकेटरसिकांना परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमधील द्वंद्वाची अनुभूती घेता येणार आहे. पहिल्या लढतीत भारताने विजय मिळवला असला तरी, ‘अव्वल चार’ फेरीमधील या लढतीत कोणता संघ अव्वल ठरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजासमोर निष्प्रभ ठरल्याने मोठी चिंता आहे. दरम्यान यासंबंधी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने शनिवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. यावेळी एक शब्द उच्चारताना राहुल द्रविडने स्वत:ला रोखलं आणि यानंतर एकच हशा पिकला.
राहुल द्रविड काय म्हणाला –
राहुल द्रविडला पाकिस्तानी गोलंदाजांबद्दल विचारण्यात आलं असता तो म्हणाला, “तुम्हाला त्यांच्या गोलंदाजीचा आदर करावा लागेल. पण आमच्याकडेही चांगले गोलंदाज असून, ते निकाल देतात याबद्दल मला आत्मविश्वास आहे”.
भारताचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर? होणार मोठी शस्त्रक्रिया
पुढे बोलताना, राहुलने आमची गोलंदाजी कदाचित त्यांच्याइतकी …., असा उल्लेख करत आपल्याला तो शब्द उच्चारण्यापासून रोखलं. आपण हा शब्द वापरत नाही म्हणत राहुल पर्यायी शब्द शोधत होता. यावेळी पत्रकार राहुलला इतर शब्द सुचवत असताना शेवटी राहुलने S… पासून सुरु होणारा चार अक्षरांचा शब्द असल्याचं म्हटलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. राहुल द्रविडलाही यावेळी हसू आवरत नव्हते.
राहुल द्रविडने यावेळी विराट कोहलीच्या कामगिरीवरही भाष्य केलं. तो म्हणाला “लोक आकडेवारी आणि संख्यांबद्दल फारच आग्रही असतात, पण भारतीय संघ विराट कोहली कशाप्रकारे संघामध्ये योगदान देतो याकडे पाहत आहे”.
“आमच्यासाठी तो किती धाव करतो हे महत्त्वाचं नाही. खासकरुन, विराटच्या बाबतीत लोक संख्या आणि आकडेवारीच्या बाबतीत फारच आग्रही होतात. पण खेळी करताना कोणत्या टप्प्यात तो किती योगदान देतो हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्याने दरवेळी अर्धशतक किंवा शतक करण्याची गरज नाही. टी-२० मध्ये छोटंसं योगदानही फार मोलाचं असतं,” असं राहुलने सांगितलं.