Mohammad Hafiz Video: पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफीझ मागील काही दिवसात भारतीय संघांवर केलेल्या टिप्पण्यांमुळे चर्चेत आहे. सुरुवातीला भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला घाबरलेला व कमकुवत म्हणत तो फार काळ कर्णधारपदी टिकणार नाही असे हाफीजने म्हंटले होते. त्यापाठोपाठ आता भारत कसा जागतिक क्रिकेटमधील ‘लाडका’ संघ आहे यावर हाफीजने आपले मत मांडले आहे. हाफिझने यासंबधी पाकिस्तानच्या पीटीव्ही वाहिनीवरील चर्चासत्रात भाष्य केले आहे. भारत चांगला खेळतोच पण जागतिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे लाड होण्यामागे हे कारण नाही असेही हाफीज म्हणाला आहे.
हाफीजने स्वतः यासंबधी शेअर केलेल्या ट्विटमध्ये आपण पाहू शकता की पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू म्हणतो, मला हे निश्चितपणे माहित आहे की आपल्याकडे जो कोणी कमावतो तो सगळ्यांना आवडणारा, सगळ्यात लाडका ठरतो.”
विशेषत: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), जागतिक क्रिकेटमध्ये “लाडका” आहे कारण ते इतके कमाई करतात. त्याने ट्विटरवर शेअर केलेल्या चर्चेच्या व्हिडीओमध्ये, त्याने इमोजीसह “लाडला” असे कॅप्शन दिले आहे. (Video: रोहित शर्मा भारताच्या कर्णधारपदी टिकणार नाही; पाकिस्तानी माजी अष्टपैलू खेळाडू म्हणतो, शर्मा नेहमीच घाबरून..)
हाफीजच्या या कमेंटनंतर पॅनेलवर एकच हशा पिकला होता पुढे हाफीज म्हणाला की, “भारत हा कमाई करणारा देश आहे. त्यामुळे जगभरातील द्विपक्षीय मालिकांमध्येही, जिथे त्यांना प्रायोजकत्व मिळते, त्यांना जॅकपॉट मिळतो, या गोष्टी नाकारणे कठीण आहे”. जेव्हा शोमधील सादरकर्त्याने विचारले की भारत उत्तम खेळामुळे ‘लाडका’ आहे की पैसे कमावतो म्हणून लाड होतात तेव्हा हाफीजने भारताची कमाई हेच त्यांचे लाड होण्यामागे मुख्य कारण आहे असे म्हंटले आहे.
पाहा व्हिडीओ
दरम्यान, भारताच्या खेळीचे जगभरात कौतुक होत असते. भारतने पाकिस्तान विरुद्ध आशिया चषक सामन्यात सुद्धा दमदार खेळीने हाफीजच्या संघाचा पराभव केला होता. त्यापाठोपाठ हाँगकाँगला सुद्धा त्याच मैदानात धूळ चारून भारत आता आशिया चषकाच्या अव्वल ४ मध्ये पोहचला आहे.
येत्या आठवड्यात पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. या सामन्यात भारत पुन्हा पाकिस्तानवर मात करणार की हाफीजचा लाडका पाकिस्तान संघ टीम इंडियासमोर आपले कर्तृत्व सिद्ध करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.