IND vs SL Asia Cup 2023, Mohmmad Siraj: भारताने रविवारी (१७ सप्टेंबर) आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेवर १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजने जबरदस्त अशी धारदार गोलंदाजी करत लंकेला दिवसा तारे दाखवले. त्याने ७ षटकांत २१ धावा देत सहा विकेट्स घेतल्या. सिराजला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने या सामन्यात केवळ भेदक गोलंदाजीच केली नाही तर त्याच्या बक्षिसाची रक्कम देखील मैदानावरील ग्राऊंड्समन्सना त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून दिली. त्याच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली.
सिराजला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. त्याला बक्षीस म्हणून ५००० डॉलर (सुमारे ४.१५ लाख रुपये) मिळाले. सिराजने औदार्य दाखवत ही रक्कम मैदानातील ग्राऊंड्समन्सना सुपूर्द केली. तो म्हणाला, “हा रोख पुरस्कार मी ग्राऊंड्समन्सना देतो ज्यांच्या मुळे हा आशिया चषक पार पडू शकला. ते या पुरस्काराचे खरे मानकरी आहेत, त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्णच होऊ शकली नसती.” आशिया खंडातील बहुतांश सामने पावसाने विस्कळीत केले. या कालावधीत ग्राऊंड्समन्सना पुन्हा पुन्हा कव्हर आणावे लागले. या स्पर्धेच्या आयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका यांनीही त्यांचे कौतुक केले.
काय म्हणाला सिराज?
सिराजला समालोचक रवी शास्त्री यांनी बिर्याणीबाबत पहिला प्रश्न विचारला. त्यांनी त्याला विचारले, “आज बिर्याणी खाल्लीस का?” यावर सिराज म्हणाला की, “आज बिर्याणी खाल्ली नाही.” यानंतर तो त्याच्या गोलंदाजीबद्दल पुढे बोलला. सिराज म्हणाला की, “मी बऱ्याच दिवसांपासून चांगली गोलंदाजी करत आहे. जेव्हा वेगवान गोलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ असतो तेव्हा त्याचा संघाला फायदा होतो. ही माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.”
श्रीलंकेविरुद्ध ६ विकेट्सघेतल्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला, “मला हे सर्वकाही स्वप्नावत वाटते आहे. मागच्या वेळी मी त्रिवेंद्रममध्ये श्रीलंकेविरुद्ध अशीच कामगिरी केली होती. त्यावेळी चार विकेट्स मिळवल्या काढल्या होत्या मात्र, पाच विकेट्स घेऊ शकलो नव्हतो. आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला मिळते याची आज जाणीव झाली. मी आजच्या सामन्यात फारसा प्रयत्न केला नाही. मी नेहमी वन डे आणि टी२० क्रिकेटमध्ये स्विंग करण्याचा प्रयत्न करत असतो. याआधीच्या सामन्यांमध्ये विशेष काही पाहायला मिळाले नाही पण, आज तो स्विंग झाला आणि मला आऊटस्विंग चेंडूवर जास्त विकेट्स मिळाल्या. मी फलंदाजांना शॉट्स खेळायला भाग पाडले.”
सिराजने वकार युनूसचा विक्रम मोडला
सिराजने २१ धावांत सहा विकेट घेत श्रीलंकेविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला. सिराजने या प्रकरणात पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वकार युनूसला मागे सोडले. वकारने १९९० मध्ये शारजाहच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २६ धावांत सहा विकेट्स घेतल्या होत्या.