Kamran Akmal on Pakistan Team: आशिया चषक २०२३च्या सुपर-४ सामन्यात पाकिस्तानचा भारताकडून दारूण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमल अत्यंत निराश झाला होता. याबाबत अकमल म्हणाला की, “जर पाकिस्तान संघाने आपला दृष्टिकोन बदलला नाही तर २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सला पराभूत करणे संघाला कठीण होऊ शकते. सुपर-४ सामन्यात भारताने पाकिस्तानवर २२८ धावांनी विजय मिळवला होता आणि त्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करत फायनलचे तिकीट गाठले.
अकमल त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पाकिस्तानच्या कामगिरीवर संतापला. तो म्हणाला, “जर तुम्हाला वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करायची असेल तर तुमचा दृष्टीकोन बदलावा लागेल. जर आशिया कप फायनलमध्ये खेळायचे असेल आणि तुमची ही वृत्ती असेल तर तुम्ही नेदरलँड्सलही पाकिस्तानला हरवण्याचा प्रयत्न करेल. व्यवस्थापन काय करत आहे? तुला पहिले गोलंदाजी करायला कोणी सांगितले?”
माजी विकेटकीपर कामरानने पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले
कामरान पुढे म्हणाला, “किमान खेळाडूंना क्रीजवर काही चेंडू तरी खेळण्यास सांगा. जर छोट्या-छोट्या भागीदारी केल्या असत्या तर आज नेट रनरेटचा एवढा दबाव तुमच्यावर राहिला नसता. पाकिस्तानची फिल्डिंग, रनिंग बीटविन द विकेट्स यात खूप सुधारणा करण्याची गरज आहे. फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर तुम्ही बांगलादेशविरुद्ध ४० षटकांत १९० धावांचा पाठलाग केला. जर असे खेळणार असला तर भारत सोडा नेदरलँड्सकडूनही तुम्ही विश्वचषकात पराभूत होऊ शकतात.”
भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर-४ सामन्यात, विराट कोहली आणि के.एल. राहुल आणि कुलदीप यादव यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला पूर्णपणे नेस्तनाबूत केले. याआधी २ सप्टेंबरला आशिया कप २०२३मध्ये दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता, तो सामना सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
कामरान अकमल पुढे म्हणाला, “पाकिस्तान संघाला संदेश पाठवा की ज्या प्रकारे शादाब, इफ्तिखार आणि सलमान आऊट झाले होते ते खूप लाजिरवाणे होते. तुम्हाला त्यांना पूर्ण षटके खेळायला सांगायला हवे होते, म्हणजे धावसंख्या किमान २६०-२८० पर्यंत गेला असता. संघ व्यवस्थापनाला माहित आहे की, पीसीबी त्यांना कठीण प्रश्न विचारणार नाही. हा दृष्टिकोन संघाला घातक आहे. मला हे सांगताना खेद वाटतो की तुम्ही एका अव्वल संघाविरुद्ध शाळकरी मुलांसारखी कामगिरी केली आहे.”
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यात काय झाले?
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलंबोमध्ये पाऊस थांबला असून रात्री ८.१० वाजता खेळ सुरू होईल. याआधी एक डाव ४५ षटकांचा होता, मात्र पावसामुळे तो ४२ षटकांचा करण्यात आला आहे. दोन्ही संघ ४२-४२ षटके खेळतील. मोहम्मद रिझवानसह इफ्तिखार अहमदला क्रीझवर यावे लागेल. पाकिस्तानची धावसंख्या ही १३०/५ आहे.