IND vs PAK, Asia Cup 2023 Scheduled: आशिया चषक २०२३च्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा लवकरच केली जाणार असून भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमीं त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी, हायब्रीड मॉडेलमध्ये खेळल्या जाणार्या आशिया चषकाचे पहिले ४ सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यात या स्पर्धेत किमान २ सामने खेळले जातील अशी पूर्ण आशा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार येत्या बुधवारी आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्यात भारत आणि पाकिस्तान दोनवेळा भिडणार आहेत.
आगामी आशिया चषक २०२३चे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु दोन कट्टर प्रतिस्पर्धी, भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेत दोनदा आमनेसामने येतील असा अंदाज त्यात वर्तवण्यात आला आहे. एका वृत्तानुसार, कार्यक्रमाची अधिकृत घोषणा बुधवारी अपेक्षित आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही सामन्यांच्या तारखांचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. पाकिस्तानी मीडिया एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना २ सप्टेंबर रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे, तर पुढील फेरीतील दुसरा सामना १०सप्टेंबर रोजी खेळला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही सामने श्रीलंकेतील कोलंबो किंवा कॅंडी येथे होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर १७ सप्टेंबर रोजी या स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा तिसरा सामना होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआय आणि पीसीबीने हायब्रीड मॉडेलवर सहमती दर्शवल्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी दोनदा एकमेकांना भिडणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक २०२३ सामने आयोजित करण्यासाठी कोलंबो हे जरी आवडते ठिकाण असले तरी, श्रीलंकेतील कॅंडी किंवा डाम्बुला येथेही एक सामना खेळवला जाऊ शकतो. पाकिस्तानचा पहिल्या गटातील सामना नेपाळविरुद्ध ३० किंवा ३१ऑगस्ट रोजी मुलतानमध्ये खेळण्याची अपेक्षा आहे. याच दिवशी मुलतानमध्ये स्पर्धेचा उद्घाटन सोहळाही होणार आहे. पाकिस्तानमधील आशिया चषक सामन्यांसाठी लाहोर हे आणखी एक ठिकाण असेल.
प्रस्तावित वेळापत्रक मंजूर झाल्यास, पाकिस्तान संघ नेपाळविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर लगेचच श्रीलंकेला रवाना होईल. दरम्यान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ उर्वरित सामन्यांसाठी श्रीलंकेला जाण्यापूर्वी त्यांचे साखळी सामने पाकिस्तानमध्ये खेळतील. भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर नजम सेठी यांच्या नेतृत्वाखालील पीसीबीच्या माजी व्यवस्थापन समितीने प्रस्तावित केलेल्या हायब्रीड मॉडेल अंतर्गत, ही स्पर्धा ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. अनेक आव्हानांचा सामना करून, आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) अखेर हायब्रिड मॉडेलला मान्यता दिली. याअंतर्गत स्पर्धेतील पहिले चार सामने पाकिस्तानमध्ये होणार असून त्यानंतर अंतिम सामन्यासह श्रीलंकेत नऊ सामने होणार आहेत.