यजमान बांगलादेश आणि श्रीलंका या संघांमध्ये रविवारी आशिया ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत सामना रंगणार आहे. बांगलादेशसाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असाच आहे. दोन सामन्यांत त्यांना एका लढतीत विजय मिळवण्यात यश आले, तर एकात पराभव झाला आहे. श्रीलंकेने पहिल्याच सामन्यात संयुक्त अरब अमिरातीला नमवले आहे. त्यामुळे विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चांगलीच चुरस रंगणार आहे.

श्रीलंका आणि बांगलादेश यांनी लिंबुटिंबू अमिरातीला नमवले असले तरी त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकलेली पाहायला मिळाली. अमिरातीला श्रीलंकेने १४ धावांनी, तर बांगलादेशने ५१ धावांनी पराभूत केले होते, परंतु दोन्ही संघांच्या फलंदाजांना अमिरातीच्या गोलंदाजांनी चांगलेच सतावले होते. श्रीलंकेला कशाबशा १२९ धावा करता आल्या, तर बांगलादेशने १३३ धावा केल्या. अमिरातीचे फलंदाज कमकुवत असल्यामुळे त्यांना विजय मिळवता आला. रविवारच्या लढतीत दोन्ही संघांच्या फलंदाजांची परीक्षा असेल.

वेळ : सायं. ७ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १

Story img Loader