आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र या सामन्यात विराट कोहलीची अनुपस्थिती भारतीय संघाला जाणवणार नाही असं मत माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे. १९ सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमध्ये दुबईच्या मैदानावर सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना विजयाची समान संधी असल्याचंही सौरव गांगुलीने स्पष्ट केलं. तो कोलकात्यात एका खासगी सोहळ्यात पत्रकारांशी बोलत होता.
आशिया खंडात भारतीय क्रिकेट संघ हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम आहे. आतापर्यंत भारताने सहावेळा आशिया चषकाचं विजेतेपद मिळवलं आहे, तर पाकिस्तानने दोनवेळा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर बीसीसीआयने विराट कोहलीला विश्रांती देऊन रोहित शर्माच्या खांद्यावर भारतीय संघाची धुरा सोपवली आहे. मात्र कोहलीच्या अनुपस्थितीचा संघावर फारसा परिणाम होणार नाही असंही गांगुली म्हणाला.
अवश्य वाचा – Asia Cup 2018 : रायडू, केदारच्या पुनरागमनाचा संघाला फायदाच – रोहित शर्मा
काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानने अंतिम फेरीत भारतावर मात करुन विजेतेपद पटकावलं होतं. या पराभवानंतर विराट कोहलीच्या भारतीय संघावर टीकेचा भडीमार झाला होता. मंगळवारी भारत हाँग काँगविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल, यानंतर भारताला पाकिस्तानशी दोन हात करायचे आहेत. भारताने हाँग काँगविरुद्धचा सामना जिंकल्यास त्यांची जागा Super 4 गटात पक्की होणार आहे. असं झाल्यास भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या निकालाचा भारताच्या आव्हानावर कोणताही फरक पडणार नाही.
अवश्य वाचा – Asia Cup 2018 : …तरच भारताला हरवणं शक्य – सरफराज अहमद