ज्ञानेश भुरे, लोकसत्ता

पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा खूप महत्त्वाची होती. या स्पर्धेतील पदकाने माझा आत्मविश्वास दुणावला आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा उंच उडी प्रकारातील खेळाडू सर्वेश कुशारेने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. त्याच वेळी जागतिक स्पर्धेतील पात्रतेची संधी या वेळी अवघ्या सहा सेंटिमीटरने हुकल्याची खंत वाटते, असेही तो म्हणाला.

सर्वेशने बँकॉक येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी २.२६ मीटर उडी मारून रौप्यपदक मिळवले. विशेष म्हणजे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे उंच उडी प्रकारातील हे केवळ दुसरेच पदक ठरले. यापूर्वी २०१३ मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत जितीन थॉमसने २.२१ मीटर उडीसह रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर यंदा सर्वेश रौप्यपदकाचा

मानकरी ठरला. सर्वेश मूळचा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील देवगावचा असून, सध्या तो पुण्यात लष्करी क्रीडा संस्थेत (एएसआय) जितीन थॉमस यांच्याकडेच मार्गदर्शन घेत आहे.

जागतिक अजिंक्यपद  स्पर्धेसाठी २.३२ मीटर, तर ऑलिम्पिकसाठी २.३३ मीटर असा पात्रता निकष आहे. जागतिक स्पर्धेसाठी आता सर्वेशला जागतिक मानांकनानुसारच खेळण्याची संधी मिळू शकते. मात्र, ऑलिम्पिक पात्रतेसाठी सर्वेशकडे अजून एक वर्ष आहे. सर्वेश म्हणाला, ‘‘जागतिक स्पर्धेसाठी पात्रता हुकल्याची खंत जरूर आहे. आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही; पण ऑलिम्पिक पात्रतेसाठी माझ्याकडे वर्षभराचा कालावधी आहे. प्रशिक्षक थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करून ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.’’

‘‘आईवडिलांकडून प्रत्येक पावलावर मिळालेल्या प्रोत्साहनामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. शाळेत असताना रावसाहेब जाधव यांनी माझी तयारी करून घेतली. सुविधांचा अभाव असूनही त्यांनी मक्याच्या भुस्याची गादी करून माझ्याकडून सराव करून घेतला. शाळेत असताना २०१२ मध्ये मिळवलेले शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील पहिले पदक आजही मला प्रेरणा देते. गुजरात राष्ट्रीय स्पर्धेत मी २.२७ मीटर उडीसह सुवर्णपदक जिंकले. ही माझी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. थॉमस सरांच्या मार्गदर्शनाचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्याचबरोबर भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेकडून मिळणारा स्पर्धात्मक अनुभव फायद्याचा ठरतो आहे,’’ असेही सर्वेशने सांगितले.

प्रत्येक स्पर्धेगणिक सर्वेशची कामगिरी उंचावत आहे. तंदुरुस्ती आणि कौशल्य याकडे त्याचे लक्ष आहे. या वर्षी तो निश्चितपणे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध करू शकेल.

– जितीन थॉमस, सर्वेशचे प्रशिक्षक