आशियाई स्पर्धेत यंदा प्रथमच भारताला पदकांच्या तालिकेत अव्वल स्थानावर झेप घेता आली. पण या स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय धावपटूंना ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत रिकाम्या हातानेच का यावे लागते?
भुवनेश्वर येथे नुकतीच आशियाई स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये भारतीय खेळाडूंनी १२ सुवर्ण, ५ रौप्य व १२ कांस्य अशी एकूण २९ पदकांची कमाई केली. भारताला आजपर्यंत मिळालेले हे सर्वोत्तम यश आहे. यापूर्वी जाकार्ता येथे १९८५ मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताला २२ पदके मिळाली होती. पुढील महिन्यात लंडन येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी शारीरिक तंदुरुस्ती राहावी व तसेच त्यासाठी भक्कम तयारी करता यावी या दृष्टीनेच चीन, कतार, बहारिन, जपान, दक्षिण कोरिया, इराण आदी देशांनी भुवनेश्वर येथील स्पर्धेत जागतिक स्पर्धेतील संभाव्य विजेत्यांना पाठविले नाही. त्याऐवजी त्यांनी दुय्यम फळीतील खेळाडूंना पाठविले होते. आपल्या पदक विजेत्यांचे कौशल्य अन्य देशांच्या खेळाडूंना व प्रशिक्षकांना समजू नये तसेच अव्वल खेळाडूंना दुखापतीस सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणूनही चीन, कतार आदी देशांनी अव्वल दर्जाच्या खेळाडूंना आशियाई स्पर्धेत विश्रांती दिली. या पाश्र्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी घरच्या मैदानावरील स्पर्धेत वर्चस्व गाजविले नाही तर नवलच. पुरुषांच्या दहा हजार मीटर व पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सोनेरी कामगिरी करीत गोपाळ लक्ष्मणन याने भारताच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. चार बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारताला पुरुष व महिला या दोन्ही विभागात सुवर्णपदकांची कमाई झाली. पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत बॅटन देताना भारतीय खेळाडूंनी केलेली चूक निश्चितच आत्मपरीक्षण करणारी आहे. अशा चुका अमेरिकेसह अन्य देशांकडून ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धामध्ये होत असतात. मात्र मुळातच भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे यश मिळत नाही. त्यामुळेच अशा चुका भारतीय खेळाडूंनी टाळल्या पाहिजेत.
मनप्रीत कौर व सुधासिंग या भारतीय खेळाडूंनी मिळविलेले यश खरोखरीच अतुलनीय आहे. गतवर्षी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेनंतर सुधासिंग हिला मोठय़ा दुखापतीस सामोरे जावे लागले होते. त्यामुळे स्पर्धात्मक सरावापासून ती सहा महिने वंचित होती. हे लक्षात घेता स्टिपलचेस शर्यतीत तिने मिळविलेले सुवर्णपदक खरोखरीच कौतुकास्पद आहे. अर्थात सुधासिंग हिने या क्रीडा प्रकारात गेली अनेक वर्षे हुकमत गाजविली आहे. मध्यम अंतराच्या शर्यतीऐवजी तिने या प्रकारावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय सार्थ ठरला आहे. आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धामध्ये तिने या शर्यतीत अव्वल स्थान मिळविले आहे. मात्र आपल्याला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक का मिळू शकत नाही याचा बारकाईने विचार तिने केला पाहिजे. जिद्द, चिकाटी व मेहनत असेल तर ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करता येते हे जमेका, अमेरिका, चीन आदी देशांचे खेळाडू सिद्ध करीत असतात. सुधासिंग हिने या देशांच्या खेळाडूंचे अनुकरण केले पाहिजे. मनप्रीत हिला सहा वर्षांची कन्या आहे. अॅथलेटिक्समधील सुपरमॉम म्हणूनच तिने लोकप्रियता मिळविली आहे. तिने आशियाई स्पर्धेतील गोळाफेकीत सोनेरी यश संपादन केले. तिचे पती करमजितसिंग हे स्वत: गोळाफेकीतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत. त्यामुळे मनप्रीत हिला त्यांच्याकडूनच प्रशिक्षण व प्रोत्साहन मिळत असते. या क्रीडा प्रकारासाठी हे दांपत्य पतियाळा येथील सराव केंद्राच्या ठिकाणी राहते. त्यांची सहा वर्षांची कन्या जसनूर हिची देखभाल मनप्रीतच्या सासूकडूनच केली जाते. आशियाई स्पर्धेसाठी सराव सुरू असताना जसनूर हिने अनेक वेळा आपल्या आईने खेळातील करिअर थांबविण्याचा हट्ट धरला होता. साहजिकच अनेक वेळा मनप्रीत हिला आशियाई स्पर्धेतून माघार घ्यावी असे वाटत होते. मात्र त्याच वेळी देशासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना तिचे मन खात होती. द्विधा मन:स्थितीत असलेल्या मनप्रीत हिला करमजित व त्याच्या घरच्यांनी पूर्ण पाठिंबा देत अॅथलेटिक्सच्या सरावावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्यामुळेच मनप्रीत ही सरावावर लक्ष केंद्रित करू शकली व भारतास सुवर्णपदक मिळवून देणारी धावपटू लाभली. आता तर तिला जागतिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. मनप्रीत हिच्या सासरच्या मंडळींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
अॅथलेटिक्समधील संधी फारच क्वचित मिळत असतात. अशा संधींच्या वेळी अक्षम्य चुकाही टाळल्या पाहिजेत. पुण्याची अर्चना आढाव हिच्याबाबत दैव देते पण कर्म नेते असाच अनुभव पाहावयास मिळाला. महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तिला सोनेरी यश मिळाले. मात्र अंतिम रेषा पार करताना तिचा डावा हात तिच्या पाठीमागे असलेल्या श्रीलंकेच्या निमाली कोंदा हिच्या वाटेत आला. निमाली हिने याबाबत तक्रार नोंदविली. तिची तक्रार ग्राह्य़ धरण्यात आली व अर्चना हिला स्पर्धेतून बाद ठरविण्यात आले. यासारखे दुर्दैव असू शकत नाही. अर्चना ही अतिशय नैपुण्यवान खेळाडू आहे. अतिशय संघर्ष करीत तिने अॅथलेटिक्समध्ये करिअर केले आहे. अर्थात तिला अजूनही भरपूर करिअर करण्याची संधी आहे. अशा चुका पुन्हा तिच्याकडून घडणार नाहीत अशी अपेक्षा आहे.
आशियाई व राष्ट्रकुल अशा स्पर्धामध्ये अव्वल यश मिळविणारे खेळाडू ऑलिम्पिक किंवा जागतिक स्पर्धेत पदक का मिळवू शकत नाहीत याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. खरंतर भारतीय खेळाडूंना आता भरपूर सुविधा व सवलती मिळत असतात. गेल्या पंधरा वर्षांमध्ये परदेशी प्रशिक्षक, परदेशातील स्पर्धात्मक सराव, फिजिओ, मसाजिस्ट, वैद्यकीय तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ अशा सर्व सुविधा पायाशी लोळण घेत असताना ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेत आपण कोठे कमी पडतो याचे आत्मपरीक्षण भारतीय खेळाडूंनी केले पाहिजे. जमेका, केनिया, इथिओपिया, युगांडा आदी लहान लहान देशांचे धावपटू ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करतात. त्यांचेही धावपटू संघर्ष करीतच अॅथलेटिक्समध्ये करिअर करीत असतात. त्यांनाही सुरुवातीच्या काळात आर्थिक हलाखीच्या परिस्थितीतून जावे लागत असते. तरीही ते ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेत पदक मिळविण्याच्या जिद्दीने सहभागी होतात आणि पदकांचे स्वप्न साकार करतात. भारतीय खेळाडू शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीमध्ये कमी पडतात. ऑलिम्पिक किंवा जागतिक पदकजिंकण्यासाठी आवश्यक असणारी जिद्द त्यांच्याकडे दिसून येत नाही. त्यामुळेच ऑलिम्पिकमधील पात्रता किंवा प्राथमिक फेरीत त्यांचे आव्हान संपुष्टात येते. खेळाडू, त्यांचे पालक, प्रशिक्षक व अॅथलेटिक्स संघटक यांनी याचा सखोल विचार केला पाहिजे. अन्यथा भारतीय खेळाडूंची मजल फक्त आशियाई किंवा राष्ट्रकुल स्पर्धापर्यंतच मर्यादित राहणार आहे.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा