अम्मान, जॉर्डन येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत १९ वर्षीय शिवा थापाने सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारतातर्फे पदक पटकावणारा शिवा सर्वात कमी वयाचा बॉक्सिंगपटू ठरला आहे. एल. देवेंद्रो सिंग आणि मनदीप जंगरा यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
आसामच्या युवा शिवाने ५६ किलो वजनी गटाच्या चुरशीच्या लढतीत जॉर्डनच्या ओबाडा अलकाबेहवर २-१ अशी मात केली. गेल्यावर्षी लंडनमध्ये ऑलिम्पिक पदार्पण करणाऱ्या शिवाने सुरनजॉय सिंग (२००९) आणि राजकुमार संगवान (१९९४) यांच्यानंतर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा मान पटकावला.
शिवाने शानदार खेळ केला. चतुराईने खेळ करत त्याने तिन्ही फेऱ्या जिंकल्या. या लढतीतला तो सर्वोत्तम बॉक्सिंगपटू होता, या शब्दांत राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्स सिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अन्य लढतींमध्ये ४९ किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या टेमेट्रास झुस्युपाव्हने एल. देवेंद्रो सिंगवर २-१ अशी मात केली तर कझाकिस्तानच्या डॅनियार येलेस्युनिव्हने ६९ किलो वजनी गटात मनदीप जंगराला नमवले.
भारतीय बॉक्सिंग संघटना बरखास्त करण्यात आल्याने भारतीय बॉक्सिंगपटू आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या झेंडय़ाखाली स्पर्धेत उतरले. भारतीयांनी या स्पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्यपदक कमावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा