‘आशियाई चॅम्पियन्स पुरुष हॉकी स्पध्रेने दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात पुन्हा स्थान मिळवले असून २० ते ३० ऑक्टोबर या कालावधीत मलेशिया येथे ही स्पर्धा पार पडणार आहे,’ अशी माहिती आशियाई हॉकी महासंघाने (एएचएफ) बुधवारी दिली. २०११मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा सलग दोन वष्रे खेळविण्यात आली. मात्र, २०१३नंतर ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय वेळापत्रकातून हद्दपार झाली होती.
रिओ ऑलिम्पिक स्पध्रेनंतर आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पध्रेत भारतासह, कोरिया, जपान, चीन, मलेशिया आणि गतविजेत्या पाकिस्तान संघाचा समावेश असणार आहे. क्वांतान विस्मा बेलिया स्टेडियमवर होणारी ही तिसरी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. याआधी २०१२ मध्ये महिला हॉकी जागतिक लीग राऊंड २ आणि २०१४ मध्ये पुरुष हॉकी चॅम्पियन्स चॅलेंज स्पध्रेचे आयोजन येथे करण्यात आले होते.
आशियाई चॅम्पियन्स चषक स्पध्रेची सर्वाधिक दोन जेतेपद पाकिस्तानच्या नावावर असून भारताने उद्घाटनीय स्पर्धा जिंकली होती. मलेशियाने तिन्ही हंगामात कांस्यपदकाची कमाई केली आहे.