IND vs PAK Asian Champions Trophy Hockey Match Preview: उपांत्य फेरीत भारताने आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. तीन वेळा चॅम्पियन असलेला भारतीय पुरुष हॉकी संघ बुधवारी म्हणजेच आज पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम राऊंड-रॉबिन लीग साखळी सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करताना चांगली खेळी खेळावी लागेल. आतापर्यंतच्या स्पर्धेत दोन्ही संघांच्या कामगिरीचा विचार केला तर भारत त्यांच्या चार सामन्यांत अपराजित आहे आणि पाकिस्तानला केवळ एकच विजय नोंदवता आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानचे या स्पर्धेत दोन सामने बरोबरीत सुटले, तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या महत्त्वपूर्ण सामन्याच्या निकालावर उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा टिकून आहेत. पाकिस्तान पराभव टाळण्याचा प्रयत्न करेल, जर जिंकू नाही शकत तर किमान भारताविरुद्ध ड्रॉ करण्याचे लक्ष्य ठेवू शकतो. ड्रॉ वरही पाकिस्तानी संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा इतर संघांच्या निकालावर अवलंबून असतील.

एका वर्षानंतर येणार आमनेसामने

भारताप्रमाणे पाकिस्तानही तीन वेळा चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता आहे. गेल्या वर्षी २३ मे रोजी जकार्ता येथे झालेल्या आशिया चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उभय संघांमध्ये शेवटचा सामना झाला होता आणि तो सामना १-१ असा बरोबरीत सुटला. गेल्या १४ सामन्यांमध्ये भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. यादरम्यान भारताने १२ विजय नोंदवले आणि दोन सामने अनिर्णित राहिले.

जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर ते अंतिम चारमध्ये पोहोचतील, पण जर ते हरले तर चीन आणि जपान यांच्यातील सामन्याच्या निकालावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. पाकिस्तान हरला तर जपानवर चीनच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. जर जपान जिंकला तर विजयाचे अंतर कमी असावे. याशिवाय मलेशियन संघाने दक्षिण कोरियाविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा, तर पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहचू शकतो.

हेही वाचा: World Cup 2023: वर्ल्डकपला फक्त ५७ दिवस बाकी; अजूनही भारताला नाही मिळाली परफेक्ट प्लेइंग-११, BCCI कधी करणार संघाची घोषणा?

भारत दहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे

भारत तीन विजय आणि एक अनिर्णीत १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर मलेशिया (९ गुण), दक्षिण कोरिया (५), पाकिस्तान (५), जपान (२) आणि चीन (१) यांचा क्रमांक लागतो. भारत आणि पाकिस्तानने ही स्पर्धा प्रत्येकी तीन वेळा जिंकली आहे, परंतु त्यांच्या सध्याच्या क्रमवारीत आणि फॉर्मनुसार, भारत बुधवारी फेव्हरिट म्हणून मैदानात उतरेल. मात्र, भारत-पाकिस्तान यांच्यात ज्यावेळी सामना होतो त्याचा रँकिंगवर फारसा फरक पडत नाही. कोणता संघ दबाव चांगल्या प्रकारे हाताळेल, त्याच्या विजयाची शक्यता जास्त असेल.

भारताला संरक्षणावर भर द्यावा लागणार आहे

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत आक्रमक हॉकी खेळली आहे आणि पेनल्टी कॉर्नरमध्ये रूपांतरित करण्यासाठी त्याचा स्ट्राइक रेट सुधारला आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला आपली बचाव फळी मजबूत करावी लागणार आहे. भारत आणि पाकिस्तानला मागच्या सामन्यांनंतर एक दिवसाची विश्रांती मिळाली आहे ज्यामुळे दोन्ही संघांना नक्कीच मदत होईल.

पाकिस्तानने त्यांच्या मागील सामन्यात चीनचा २-१ अशा

कमी फरकाने पराभव करून उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, संघाला मिळालेल्या संधींचा फायदा घ्यावा लागेल. शिवाय, भारतीय संघाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरघोस पाठिंब्याच्या दबावाखाली पाकिस्तान कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : कोलंबियाची घोडदौड कायम; प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत

उपांत्य फेरीत पुन्हा संघर्ष होऊ शकतो

हा सामना जिंकून भारताला अव्वल स्थान कायम राखायचे आहे. अव्वल संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी भिडणार असल्याने उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या क्रमांकाचा संघ उपांत्य फेरीत तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी खेळेल. मात्र त्याआधी पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहचणे आवश्यक आहे.

स्पर्धेतील भारताचा आतापर्यंतचा प्रवास

पहिल्या सामन्यात चीनचा ७-२ असा पराभव केला

जपानविरुद्ध १-१ अशी बरोबरी झाली

मलेशियाचा ५-० असा एकतर्फी पराभव केला

गतविजेत्या दक्षिण कोरियाचा ३-२ असा पराभव केला

या स्पर्धेत पाकिस्तानचा आतापर्यंतचा प्रवास

मलेशियाकडून १-३ असा पराभव

दक्षिण कोरियासोबत १-१ अशी बरोबरी झाली

जपानसोबत ३-३ अशी बरोबरी

शेवटच्या सामन्यात चीनचा २-१असा पराभव केला

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian champions trophy india pakistans big match in hockey today pak will be out of semi final race if they lose avw